भारतीय निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक संदर्भात आणलेल्या दुरुस्तीबाबत आज बेळगावमध्ये प्रक्रिया सुरु झाली आहे. सोमवारी बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात या प्रक्रियेला सुरुवात झाली असून डीसीपी रवींद्र गडादि आणि अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्याहस्ते या प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला.
वृक्षाला पाणी घालून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर डीसीपी रवींद्र गडादि बोलताना म्हणाले, सरकारने जारी केलेल्या योजना, उपक्रमांची योग्य वेळेत आणि योग्यप्रकारे अंमलबजावणी करणे हि आम्हा अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी संलग्न करण्यासंदर्भातील सर्व माहिती घरोघरी जाऊन प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले.
अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी सांगितले कि, बीएलओ, महाविद्यालयाचे प्राचार्य, बीएलओ सुपरवायझर आदींनी भारतीय निवडणूक आयोगाने आणलेल्या दुरुस्तीबाबत जागृती करावी. आधार क्रमांक मतदार ओळखपत्राशी जोडण्याची प्रक्रिया ३१ मार्च २०२३ पर्यंत १०० टक्के पूर्ण करणे हा उद्देश असून दुहेरी मतदान रोखण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने याची अंमलबजावणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनीहि अधिकाऱ्यांना सूचना देत पारदर्शक मतदार यादी तयार करण्यासाठी आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे असे आवाहन केले. आधार क्रमांक मतदार ओळखपत्राशी जोडल्याने बनावट मतदान रोखता येईल, पारदर्शी निवडणुका पार पडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास अतिरिक्त पोलीस अधीक्षक महानिंग नांदगावी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.