Friday, December 27, 2024

/

…तर निश्चितपणे खो-खोला गतवैभव प्राप्त होईल -परांजपे

 belgaum

युवा पिढीला खो खो खेळ खेळायला निश्चितपणे आवडेल. मात्र त्यांच्यात तो स्फुलिंग जागवावयास हवा. निखार्‍यावरील राख झटकल्यावर तो जसा प्रज्वलित होतो तसे खो-खोच्या बाबतीत झाले आहे. त्यावरील राख हटविण्यासाठी फक्त कोणीतरी फुंकर मारायला हवी. या खेळावरील मळभ हटवल्यास तो पुन्हा प्रज्वलित होऊन त्याला पूर्वीचे चांगले दिवस येण्याद्वारे निश्चितपणे गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास सेवानिवृत्त शिक्षक आणि नामवंत ज्येष्ठ खोखो प्रशिक्षक विजय परांजपे यांनी व्यक्त केला.

शहरातील देशपांडे गल्लीतील भरतेश हायस्कूल तसेच हालगा येथील जे. आर. दोड्डन्नावर शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक 75 वर्षीय विजय परांजपे सर नामांकित ज्येष्ठ खोखो प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो खो-खो खेळाडू निर्माण झाले आहेत. गेल्या कांही वर्षापासून हैद्राबाद येथे स्थायिक झालेले मात्र बेळगावला ये -जा करणाऱ्या परांजपे सरांशी आज सोमवारी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने बेळगाव त्यांच्याकडून खो-खो या खेळाविषयी आणि बेळगाव येथील खो-खो खेळाबद्दल बेळगाव लाईव्हने संवाद साधला असता त्यांनी उपरोक्त विश्वास व्यक्त केला.

खो खो खेळातील आपल्या कारकिर्दीबद्दल बोलताना परांजपे सर म्हणाले की, 1979 साली भरतेश शिक्षण संस्थेत रुजू होण्यापूर्वी मी महाराष्ट्रात शिरोड्याला होतो. तेथील अजगाव येथील पब्लिक स्कूलमध्ये मांजरेकर क्लब म्हणून एक क्लब होता. लहानपणापासून खो-खो खेळण्याची आवड असल्यामुळे त्या क्लबच्या ठिकाणी खोखो खेळणाऱ्या मुलांना मी सहज मार्गदर्शन करू लागलो. माझ्या या मार्गदर्शनामुळे त्या मुलांनी स्थानिक खोखो स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले. त्यानंतर जुलै 1979 मध्ये मी बेळगावच्या भरतेश शाळेमध्ये रुजू झालो. तेंव्हापासून ते गेल्या 2006 पर्यंत खोखो खेळाडू घडविण्याचे कार्य केले. त्या शाळेत त्यावेळी के. एल. दिवटे आणि डी. एस. पाटील हे दोन क्रीडा शिक्षक होते. आमच्या संस्थेत एकूण 20 क्रीडा शिक्षक होते. मात्र दुर्दैवाने एकालाही 100 मीटर धावता येत नव्हतं किंवा लांब उडी मारता येत नव्हती. थोडक्यात प्रत्येक जण फक्त उदरनिर्वाहासाठी नोकरी करत होता. त्यावेळी माझे खो-खो मधील प्राविण्य लक्षात घेऊन मुख्याध्यापकांनी माझ्यावर शाळेच्या खो-खो संघाला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपवली आणि तेंव्हापासून खो-खो प्रशिक्षक म्हणून माझा प्रवास सुरू झाला. माझ्या हाताखाली तयार झालेले प्रभाकर चौगुले, प्रकाश पुजारी, परशुराम जाधव, आनंदाचे, विनायक चौगुले, मुलींमध्ये पवार भगिनी, झेंडे, ठाकूर वगैरे जवळपास शंभर एक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. सेवानिवृत्तीनंतरही जवळपास 6 महिने मी खोखो प्रशिक्षक म्हणून काम केले. मात्र त्यानंतर घरगुती कारणास्तव मला ते काम बंद करावे लागले अशी माहितीही विजय परांजपे यांनी दिली.

क्रिकेट हा भारतात अत्यंत लोकप्रिय आहे. आता मोठ्या रकमेच्या प्रो कबड्डी स्पर्धांमुळे हळूहळू कबड्डी देखील लोकप्रिय होत आहे. या पार्श्वभूमीवर खो-खो मात्र मागे पडले असून या स्वदेशी खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. खो खो खेळायला देखील चांगले दिवस येऊ शकतात. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की या खेळाचे सध्याचे जे अंपायर अर्थात पंच आहेत त्यांना खो-खोचे नियमच माहीत नाहीत आणि हेच लोक या खेळाला मारक ठरले आहेत. एकेकाळी आम्ही जेंव्हा खेळत होतो, त्यावेळी कांही पंच असे असायचे की ते आपल्याच संघाला सामना जिंकून देणार असा त्यांच्यावर शिक्काच मारलेला असायचा. त्याकाळी बेळगाव परिसरातील प्रा. आनंद मेणसे यांचा साधना खो-खो संघ, एम. एस. पाटील यांचा भगतसिंग खो-खो संघ यासारखे चार संघ अत्यंत मातब्बर समजले जात. तेंव्हापासून पक्षपाती पंचांनी खो-खो खराब केला. बेळगाव परिसरातील खो खो खेळ नष्ट करण्याचं काम या ठराविक पंचमंडळींनी केलं.Vijay paranjape

आपलेच खेळाडू पुढे गेले पाहिजेत असा त्यांचा प्रयत्न असायचा. या पक्षपाती पंचांमुळे बेळगावातील मातब्बर संघ लयास गेले आहेत. आमच्या संघाला देखील त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र आमच्याकडे एकापेक्षा एक सरस खेळाडूंची खाणच असल्यामुळे आम्ही त्यांना पुरून उरलो.

स्वतः खो-खो पंच वगैरे होण्याचा प्रयत्न केला नाही का? या प्रश्नाला उत्तर देताना यांनी पंच अंपायर होण्यापेक्षा कोणतीही पद अथवा पुरस्काराची अपेक्षा न ठेवता चांगले दर्जेदार खोखो खेळाडू निर्माण करणे हा माझा एकच ध्यास होता असे सांगून अनेक राष्ट्रीय स्तरावरील अनेक खोखो खेळाडू घडविल्याचे त्यांनी सांगितले. चांगले खेळाडू निर्माण झाले तरच खो-खो टिकणार आणि वृद्धिंगत होणार हे लक्षात घेतले पाहिजे. माझ्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या खेळाडूंनी चांगले नांव कमावले तीच माझी गुरुदक्षिणा असे मी समजतो असेही परांजपे यांनी सांगितले.National sports day

मुलांना एकदम खो-खो खेळण्यास शिकविल्यास त्यांचे पायाचे स्नायू जखडू (मसल कॅच) शकतात. पूर्वी लहानपणी लंगडी खेळली जायची. त्यामुळे पायांच्या स्नायूंना व्यायाम होऊन पौगंडावस्थेपर्यंत ते बरेच मजबूत होत. त्यामुळे त्या काळात मुले पटकन खो-खो खेळात पारंगत होत. थोडक्यात खोखोसाठी पाया अर्थात पाय घट्ट हवा. लंगडीप्रमाणेच पूर्वीचा आट्यापाट्या हा खेळ जो कोणाला आता माहित नाही तो शिकणे आवश्यक आहे. आमचे खो-खोचे प्रशिक्षण दोन -दोन तास चालत होते. या प्रशिक्षणामध्ये धावण्याच्या सरावाबरोबरच माकड उड्या, लाईट टच आदी कौशल्यांचे धडे दिले जात. आजच्या युवा पिढीला खो खो खेळ खेळायला निश्चितपणे आवडेल.

मात्र त्यांच्या तो स्फुलिंग जागवावयास हवा. निखार्‍यावरील राख झटकल्यावर तो जसा प्रज्वलित होतो तसे खो-खोच्या बाबतीत झाले आहे, त्यावरील राख हटविण्यासाठी फक्त कोणीतरी फुंकर माराव्या असावी. या खेळावरील मळभ हटवल्यास तो पुन्हा प्रज्वलित होऊन त्याला पूर्वीचे चांगले दिवस येण्याद्वारे गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त करून मात्र यासाठी सर्वांचे एकजुटीने प्रयत्न आवश्यक आहेत, असे विजय परांजपे यांनी शेवटी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.