कोणतीही पूर्वसूचना न देता बेळगाव उप नोंदणी (सब रजिस्ट्रार) कार्यालय दुरुस्तीच्या कारणास्तव आज अचानक टाळे ठोकून बंद ठेवण्यात आल्यामुळे असंख्य लोकांचा कामाचा खोळंबा होण्याबरोबरच वेळेचा अपव्य झाल्याने त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कोणतीही पूर्वसूचना न देता बेळगाव सब रजिस्ट्रार कार्यालय आज अचानक बंद ठेवण्यात आले. त्यामुळे या कार्यालयाशी संबंधित कामांसाठी आलेल्या लोकांची आज सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. चौकशी केली असता दुरुस्तीच्या कारणास्तव कार्यालय बंद ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. परिणामी आपले काम तर झालेच नाही शिवाय वेळेचा अपव्यय झाल्यामुळे उपस्थितांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
या कार्यालयाच्या माध्यमातून खरंतर सरकारला दररोज लाखोच्या अथवा कोटीच्या घरात महसूल मिळत असतो. हा महसूल आज अचानक कार्यालय बंद करण्यात आल्यामुळे बुडाला आहे.
कार्यालयीन दुरुस्तीची कामे असल्यास ती सुट्टीचा दिवस पाहून केली जावीत अथवा त्यासाठी कामाच्या दिवशी कार्यालय बंद ठेवावयाचे असल्यास तशी पूर्वसूचना वृत्तपत्र अथवा प्रसार माध्यमांद्वारे जाहीररित्या देणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया उपस्थित यामध्ये व्यक्त होत होती. मात्र असे न करता आज सब रजिस्ट्रार कार्यालय अचानक टाळे ठोकून बंद ठेवण्यात आले. त्यामुळे इतर कामे सोडून सदर कार्यालयाशी संबंधित आपले काम लवकर आटपण्यासाठी आलेल्या जवळपास शंभर -दीडशे लोकांची गर्दी आज सकाळी सब रजिस्ट्रार कार्यालयासमोर झाल्याचे पहावयास मिळाले.
या सर्वांच्या संबंधित कामाचा खोळंबा तर झालाच शिवाय काम उरकण्यासाठी केलेली धावपळ आणि वेळेचा अपव्यय झाला तो वेगळा. सदर प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्याबरोबरच सरकारच्या एका जबाबदार कार्यालयाकडून या पद्धतीने मनमानी कारभार होत असेल तर सर्वसामान्य जनतेने कोणाकडे न्याय मागायचा? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
कुणाच्या आदेशावर नोंदणी कार्यालय बंद?,सुजित मुळगुंद यांनी उपस्थित केला प्रश्न pic.twitter.com/CNjM1eDSlq
— Belgaumlive (@belgaumlive) August 24, 2022