प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी नैऋत्य रेल्वेने मिरज ते लोंढा, हुबळी ते मिरज आणि मिरज ते कॅसलरॉक यादरम्यान आरक्षण विरहित एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून येत्या दि. 25 व 26 ऑगस्टपासून या रेल्वेंची सेवा सुरू होणार आहे.
सदर तीनही रेल्वे आरक्षित नसल्यामुळे प्लॅटफॉर्मवर तिकीट काढून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. या एक्सप्रेस रेल्वे असल्या तरी अनेक प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. रेल्वे क्र. 07351 आणि 07352 ही मिरज-लोंढा-मिरज एक्सप्रेस रेल्वे दि. 25 ऑगस्टपासून मिरज येथून तर दि. 26 ऑगस्टपासून लोंढ्याहून धावेल. मिरजेहून दररोज सायंकाळी 7 वाजता प्रस्थान करणारी ही रेल्वे बेळगावला रात्री 10:05 वाजता पोहोचेल.
तसेच लोंढा येथे रात्री 11:55 वाजता पोहोचेल. लोंढ्याहून रोज पहाटे 5 वाजता निघणारी लोंढा-मिरज-लोंढा एक्सप्रेस रेल्वे सकाळी 6:10 वाजता बेळगाव तर सकाळी 9:45 वाजता मिरजेला पोहोचणार आहे.
रेल्वे क्र. 17333 व 17334 ही मिरज-कॅसलरॉक-मिरज एक्सप्रेस रेल्वे दोन्ही बाजूने दि. 26 ऑगस्टपासून धावेल. ही रेल्वे मिरजेहून रोज सकाळी 10:15 वाजता निघून दुपारी 1:25 वाजता बेळगाव तर सायंकाळी 4:30 वाजता कॅसलरॉकला पोहोचेल. कॅसलरॉक येथून सायंकाळी 5 वाजता निघून 7:10 वाजता बेळगाव तर रात्री 8:40 वाजता मिरजेला पोहोचेल. रेल्वे क्र. 17332 व 17331 ही हुबळी-मिरज-हुबळी एक्सप्रेस रेल्वे हुबळी येथून दि. 25 रोजी तर मिरजहून दि. 27 ऑगस्ट रोजी धावेल.
ही रेल्वे हुबळीहून सकाळी 10:30 वाजता निघून दुपारी 2:40 वाजता बेळगाव आणि सायंकाळी 6:30 वाजता मिरजेला पोहोचेल. मिरजेहून होऊन सकाळी 6:10 वाजता निघून सकाळी 9:45 वाजता बेळगाव आणि दुपारी 3 वाजता हुबळीला पोहोचेल. या तीनही रेल्वे एक्सप्रेस असल्या तरी एकंदरीत पॅसेंजरच म्हणाव्या लागतील बेळगावहून सध्या बेळगाव ते शेडबाळ एकच पॅसेंजर रेल्वे धावत असल्यामुळे उपरोक्त रेल्वे सेवा सुरू झाल्यास अनेक प्रवाशांना त्याचा लाभ होणार आहे.