निवडणूक होऊन एक वर्ष पूर्ण होत आलं तरी अद्याप बेळगाव महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक होत नसल्याने आक्रमक झालेल्या काँग्रेसने आगळे वेगळे आंदोलन हाती घेतले आहे. ९ ऑगस्ट रोजी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी बेळगावच्या दोन्ही आमदारांना महापौर उपमहापौरांचे गाऊन देणार असल्याचे म्हटले आहे. शनिवारी दुपारी बेळगाव येथील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आगामी विधानसभा निवडणूक होईपर्यंत बेळगावच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार नाही. बेळगावच्या दोन्ही आमदारांनी बेकादेशीररित्या महापौर-उपमहापौर पद बळकावले आहे, असा घणाघाती आरोप सतीश जारकीहोळी यांनी केलाय. ९ ऑगस्ट रोजी केपीसीसीचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांच्या कार्यक्रमात या दोन्ही आमदारांना महापौर उपमहापौर पदाचे गाऊन देण्यात येतील असा टोलाही त्यांनी लगावला.
महापालिका निवडणुकीत निवडून आलेले भाजपचे नगरसेवक देखील निवडणूक न झाल्याने नाराज आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. ते फक्त नाराज आहेत मात्र काँग्रेसमध्ये सहभागी होणार नाहीत असे स्पष्टीकरण देखील त्यांनी यावेळी दिले.
दावणगेरे येथील सिद्धरामय्या यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमामुळे काँग्रेसला बळकटी मिळाली असून हा काँग्रेसचा ऐतिहासिक मेळावा ठरला. या मेळाव्यामुळे राज्यात काँग्रेस बलशाली झाला असल्याचा दावादेखील त्यांनी केला. माजी आमदार फिरोज सेठ आणि सतीश जारकीहोळी यांच्यात असलेल्या परस्पर मतभेदांसंदर्भात बोलताना ते म्हणाले, प्रत्येक पक्षात छोटे मोठे वाद असतातच. ते वाद मिटविण्यात येतील, असेही सतीश जारकीहोळी म्हणाले.
जाधव नगर येथे आलेला बिबट्या हा आम्हा दोघातील वाद मिटवायला आला नसून वाढत्या महागाईवर भाजपाला वळणावर आणण्यासाठी आला असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. विधानसभा निवडणूक आठ महिन्यांवर येऊन ठेपली असताना यमकनमर्डी मतदारसंघाचे प्रभारी पद उमेश कत्ती आणि दक्षिणच्या आमदारांना देण्यात आले आहे ही गोष्ट मला एक वर्षापूर्वी माहिती होती असे सांगत निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असेहि जारकीहोळी यांनी सांगितले.