टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेटनजीक असलेल्या नेटिव्ह हॉटेल पाठीमागील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून आज या रस्त्यावरील चिखलाच्या खड्ड्यात एक मालवाहू टेम्पो रुतून पडल्याची घटना घडली.
तिसऱ्या रेल्वे गेटनजीक असलेल्या नेटिव्ह हॉटेल पाठीमागील चन्नम्मानगर येथून बेळगाव -खानापूर हमरस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याचे विकास काम गेल्या कित्येक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत येणाऱ्या या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरणाचा स्पर्शही न झाल्यामुळे या मार्गाला खेड्यातील कच्च्या रस्त्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सध्या पावसाळ्यात तर मोठे खाचखळगे पडलेल्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाची दलदल निर्माण झाली आहे.
रस्त्यावरील खड्डे पावसाचे पाणी आणि चिखलाच्या दलदलीने भरून गेले असल्यामुळे अंदाज न आलेला एक मालवाहू टेम्पो त्यात रुतून पडल्याची घटना आज घडली. यामुळे टेम्पो चालक आणि मालकाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. संबंधितांना खड्ड्यातील दलदलीत रुतून पडलेला टेम्पो बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयास करावे लागले.
नेटिव्ह हॉटेल पाठीमागील सदर रस्ता चन्नमानगर येथील रहिवाशांना बेळगाव -खानापूर हमरस्त्यावर येण्यासाठी अत्यंत जवळचा आणि सोयीचा पडतो. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी रहदारी असते. मात्र गेल्या कांही महिन्यापासून या रस्त्याचे विकास काम रखडल्यामुळे या मार्गावरून ये -जा करणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
खड्ड्यांमुळे दुचाकी चालवताना तर फारच मोठी कसरत करावी लागते. खाचखळल्यामुळे या रस्त्यावर किरकोळ अपघात आणि वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. तेंव्हा लोकप्रतिनिधी आणि संबंधित खात्याने याकडे लक्ष देऊन या रस्त्याचे विकास काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.