देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त गेल्या 16 जुलैपासून कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस मोफत दिला जात असल्यामुळे बेळगाव जिल्ह्यात त्याला व्यापक प्रतिसाद मिळत असून दररोज 12 ते 15000 बुस्टर डोस घेण्यात येत असल्याची नोंद आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोस चा सरासरी टक्का 100 टक्के पार झाला आहे. त्यामुळे आता केवळ बूस्टर डोसचा टक्का वाढविला जात आहे. त्या अनुषंगाने लसीकरण केंद्रे पुन्हा सक्रिय करण्यात आली आहेत. कांही महिन्यांपूर्वी बूस्टर डोससाठी शुल्क आकारले जात होते. मात्र यंदा देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. हे औचित्य साधून 16 जुलैपासून सलग 75 दिवस विनाशुल्क बूस्टर डोस देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
या घोषणेला जिल्ह्यात उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यासह राज्यातही लसीकरणाचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात 1 लाख 45 हजार बूस्टर डोस देण्यात आल्याची नोंद आहे. या कालावधीत दररोज सुमारे 12 ते 15 हजार जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे.
पूर्वीच्या तुलनेत लसीकरणाचा टक्का वाढला असला तरी त्यात अजून वाढ अपेक्षित आहे. बूस्टर डोस ज्यांनी घेतलेला नाही त्यांच्यासाठी ही चांगली संधी असून प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे.