रेल्वे विभागाकडून विविध वर्गातील, दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘मासिक सिझन तिकीट’ योजना राबविली जाते. या सुविधेअंतर्गत हजारो प्रवासी दररोज रेल्वेतून ‘अप-डाऊन’ करतात. बेळगावमधून इतर ठिकाणी दररोज असे हजारो प्रवासी या सिझन तिकिटाच्या सेवेचा लाभ घेतात. बेळगावमधून दररोज ‘मिरज-बेळगाव’ पॅसेंजर्समधून शेकडो प्रवासी कामानिमित्ताने प्रवास करतात.
सध्या या रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात आल्याने बेळगाव-मिरज दरम्यान येणाऱ्या ररायबाग, कुडची, घटप्रभा यासह अनेक स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. यादरम्यान कॅसलरॉकहुन येणारीही एक रेल्वे प्रवाशांना सोयीस्कर ठरत होती. मात्र या रेल्वेच्या वेळेत देखील बदल करण्यात आल्याने प्रवासी वर्गाची फरफट होत आहे. कॅसलरॉकहुन येणारी रेल्वे सुरुवातील सकाळच्या वेळेत यायची. दरम्यान हि रेल्वे बंद झाली होती.
पुन्हा हि रेल्वे सुरु करण्यात आली मात्र रेल्वेची वेळ सकाळच्या ऐवजी संध्याकाळी करण्यात आल्याने या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या नागरिकांना ताटकळत उभारावे लागत आहे. सकाळी ८ च्या सुमारास येणारी हि रेल्वे सायंकाळी ७ ते ८ च्या दरम्यान रेल्वे स्थानकावर येत आहे. यामुळे सदर रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात यावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.
शेडबाळ पॅसेंजर हि रेल्वेसुविधाही या प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरत होती.दिवंगत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांनी हि रेल्वेसेवा सुरु केली होती. मात्र हि रेल्वेसेवाही सध्या बंद आहे. यामुळे प्रवाशांकडे इतर पर्यायच शिल्लक न राहिल्याने कामानिमित्ताने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणी निर्माण होत आहेत.
दूरचा प्रवास कमीतकमी वेळेत आणि सवलतीच्या दरात व्हावा यासाठी एमएसटी (MST) म्हणजेच मासिक सिझन तिकीटाची संकल्पना रेल्वे विभागाने राबविली होती. मात्र रेल्वेसेवाच सुरळीत नसल्याचे प्रवाशांना अधिक पैसे तर खर्च करावे लागतच आहेत शिवाय वेळापत्रक देखील कोलमडत आहे.
नाममात्र दरात प्रवास करणाऱ्या नागरिकांना बेळगाव – मिरज, कॅसलरॉक आणि शेडबाळ पॅसेंजर या रेल्वे सोयीस्कर ठरत होत्या. मात्र सदर रेल्वेचे वेळापत्रक बदलल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून रेल्वे विभागाने हि समस्या लक्षात घेऊन तात्काळ यावर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.