पदवी पूर्व द्वितीय वर्ष (बारावी) परीक्षेच्या आपल्या निकालाबाबत बऱ्याच विद्यार्थी -विद्यार्थिनींनी आक्षेप घेऊन अर्ज केला होता. या सर्व विद्यार्थ्यांची पुनर्संकलन (रिटोटलिंग) आणि पुनर्मुल्यांकन (रिव्हॅल्युएशन) यादी कर्नाटक सरकारच्या पदवीपूर्व शिक्षण खात्याने नुकतीच जाहीर केली आहे. मात्र या यादीमुळे परीक्षेच्या पेपर तपासणीतील सावळा गोंधळ पर्यायाने पेपर तपासणी आणि मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांची अपात्रता आणि बेजबाबदारपणा उघड्यावर आला आहे.
राज्याच्या पदवी पूर्व शिक्षण खात्याने पीयूसी सेकंड ईयर अर्थात परिपूर्ण द्वितीय वर्ष परीक्षेचा निकाल झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या निकालाबाबत आक्षेप घेतला होता. यापैकी काहींनी परीक्षेतील एखाद्या विषयाच्या एकूण गुणांच्या पुनर्संकलनासाठी (रिटोटलिंग) तर बहुतांश विद्यार्थी -विद्यार्थिनींनी ठराविक विषयाच्या पेपरच्या पुनर्मुल्यांकनासाठी (रिव्हॅल्युएशन) अर्ज केले होते.
विद्यार्थी विद्यार्थिनींची रिटोटलिंग आणि रिव्हॅल्युएशन यादी नुकतीच जाहीर झाली असली तरी त्याद्वारे अप्रत्यक्षरीत्या परीक्षेचे पेपर किती बेजवाबदारपणे तपासले जातात. गुणांची एकूण बेरीज करताना केली जाणारी गफलत, थोडक्यात पेपर तपासणीतील सावळा गोंधळ उघड्यावर आला आहे. परिणामी पेपर तपासणीसांच्या पात्रतेबद्दल शंका घेण्यास वाव निर्माण झाला आहे.
यंदाच्या पदवी पूर्व द्वितीय वर्षाच्या परीक्षेतील एखाद्या विषयाच्या गुणांच्या रिटोटलिंगसाठी 239 विद्यार्थी -विद्यार्थिनींनी अर्ज केले होते. या विद्यार्थ्यांपैकी अवघे 10 जण वगळता उर्वरित सर्वांना वाढीव गुण मिळाले आहेत. याचा अर्थ तब्बल 229 विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या एकूण गुणांची बेरीज करताना गफलत करण्यात आल्याचे स्पष्ट होते. परीक्षेत अवघे 20 गुण मिळालेल्या एका परीक्षार्थीची ही गुणसंख्या रिटोटलिंग नंतर 66 गुणांनी वाढून चक्क 86 गुण इतकी झाली आहे. कमी जास्त एक दोन गुणांचा फरक आपण समजू शकतो, परंतु तब्बल 66 गुणांचा फरक अचंबित करणार आहे. या पद्धतीने रिटोटलिंगमध्ये बहुतांश परीक्षार्थींना 15, 20, 30 असे वाढीव गुण मिळाले आहेत.
यामुळे पेपर तपासणी करणाऱ्या शिक्षकांच्या पात्रतेबाबत शंका निर्माण होण्यास वाव आहे. रिव्हॅल्युएशनच्या बाबतीत देखील थोड्याफार फरकाने हाच प्रकार घडला आहे. यंदा 2047 परिक्षार्थ्यांनी रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज केले होते. यापैकी बहुतांश परीक्षार्थींची गुणसंख्या वाढली आहे.
एकंदर यंदाच्या पदवी पूर्व द्वितीय वर्ष परीक्षेच्या पेपर तपासणीत सावळा गोंधळ होता हेच स्पष्ट होते. यावेळची रिटोटलिंग आणि रिव्हॅल्युएशनची यादी पाहता पेपर तपासणीसांची अपात्रता आणि बेजबाबदारपणा उघड झाला असला तरी त्याचा फटका मात्र विद्यार्थी -विद्यार्थिनींना बसला आहे. विशेष करून सीईटी परीक्षेच्या बाबतीत संबंधित विद्यार्थ्यांचे जे नुकसान होणार आहे त्याला जबाबदार कोण? असा सवाल केला जात आहे.
तसेच दहावीनंतर पदवी पूर्व द्वितीय वर्षाची (बारावी) परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. तेंव्हा अशा परीक्षेसाठी उत्तम पात्रतेच्या पेपर तपासणीसांची नियुक्ती केली जावी अशी मागणीही केली जात आहे.