बेळगाव लाईव्ह विशेष : अगणित श्री गणेश भक्तांच्या आवडीचा सण म्हणजे श्री गणेश चतुर्थी… वर्षभर आतुरतेने वाट पाहून भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला श्री गणेशाची स्थापना होते. घराघरात, चौकाचौकात, अनेक गल्ल्यांमधून श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते.
सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांची लगबग तर चार ते सहा महिन्यांपासून सुरु असते. गणेश भक्तांचा अपूर्व उत्साह, जल्लोष आणि जोश हा आगमन सोहळ्यासह विसर्जनापर्यंत कायम असतो. याच सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांच्या विघ्नहर्त्या श्रीमूर्ती आणण्यासाठी प्रशासनाने ठरवून देण्यात आलेल्या मार्गावर मात्र अनेक विघ्ने मंडळाच्या सदस्यांसह गणपती बाप्पांनाही पार पाडावी लागतात!
बेळगाव शहरात कपिलेश्वर ओव्हर ब्रिज आणि रेल्वे ओव्हर ब्रिज असे दोन ब्रिज (उड्डाणपूल) हे ‘लिंक रोड’ आहेत. शहापूर, खासबाग, अनगोळ, वडगाव यासह शहरातील अनेक भागांना जोडणारे हे दोन उड्डाणपूल मात्र सध्या दुर्लक्षित आहेत. कपिलेश्वर उड्डाणपुलाची तर उदघाटनानंतर एकदाही देखभाल केलेली दिसून आली नाही. बंद पडलेले पथदीप, उड्डाणपुलाची झालेली दुरवस्था हि सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या वाहतुकीलाही अडचणीची ठरत आहे.
अशातच अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या श्री गणेशोत्सवासाठी तर हे दोन्ही उड्डाणपूल महत्वपूर्ण आहेत. दोन्ही उड्डाणपुलांवर सर्वसामान्य सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असूनही यासंदर्भात रेल्वे विभाग, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा अनेक विभागांचे दरवाजे ठोठावण्यात आले. मात्र प्रत्येक ठिकाणी सदर उड्डाणपुलाचे देखभालीचे काम आपल्याकडे नसल्याचे सांगत एकमेकांकडे बोट करून दाखविण्यात आले. शिवाय प्रशासनाच्या दरबारी पावसाचे निमित्त देण्यात आले.
शहरातील सामाजिक संस्थांनी याचे भान ठेवून आपापल्या परीने या उड्डाणपुलावर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र गणेशोत्सवादरम्यान कोणतीही समस्या अथवा अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने पाऊले उचलणेही आवश्यक आहे. अन्यथा आता बाप्पा तुम्हालाच आमच्या स्मार्ट सिटीसाठी आवश्यक ती उपाययोजना करावी लागेल, जेणेकरून स्वप्नवत वाटणारी आमची स्मार्ट सिटी कधी प्रत्यक्षात स्मार्ट होणारच नाही!
यासंदर्भात प्रशासनाच्या निदर्शनात हि बाब आणून देण्यासाठी मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाचे पी आर ओ विकास कलघटगी,स्वागताध्यक्ष मदन बामणे,सचिव गणेश दड्डीकर आदींसह इतर मंडळींच्या शिष्टमंडळाने नुकतीच जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेतली. कपिलेश्वर उड्डाणपुलावरून कपिलेश्वर तलाव आणि रेल्वे ओव्हर ब्रिजवरून जक्केरी होंडा याठिकाणी श्रीमूर्ती विसर्जनासाठी सार्वजनिक मंडळे तसेच घरगुती गणेश विसर्जन करण्यात येते.
श्रीमूर्ती आगमन आणि विसर्जन करण्यासाठी हे दोन प्रमुख आणि महत्वाचे उड्डाणपूल असून या उड्डाणपुलांवरील पथदीपांची व्यवस्था, उड्डाणपूल मार्गाची झालेली दुरवस्था याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले.
स्मार्ट सिटी म्हणून परिवर्तित होत असलेल्या बेळगाव शहरातील विकासकामांना पुरस्कृत केले गेले. याउलट बेळगावमधील अनेक रस्त्यांची झालेली दुरवस्था! खड्ड्यात रस्ते कि रस्त्यात खड्डे असा प्रश्न निर्माण होण्याची परिस्थिती हा सारा स्मार्ट सिटीचा विरोधाभास दिसून येत आहे. श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने या उड्डाणपुलांसहित शहरातील प्रमुख मार्गांवर योग्य व्यवस्था करून गणेशभक्तांची गैरसोय टाळणे अत्यंत महत्वाचे आहे.