ख्यातनाम वन्यजीव कार्यकर्ते गजानन शेटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गोवा राज्याच्या सीमेवरील कळसा नाला खोऱ्यात कणकुंबीनजीक ‘मलाबार ट्री टॉड’ हा स्थानिक दुर्मिळ प्रजातीचा बेडूक आढळून आला. अन् त्या बेडकाच्या दर्शनाने सर्वांना दिवस सार्थकी चांगल्या सारखे वाटले.
गजानन शेटे आणि त्यांच्या समवेत असलेल्या विवेकानंद एन्व्हेरॉनमेंट अवेअरनेस ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना गोव्याच्या म्हादाई अभयारण्याच्या दिशेने जंगलात जाणाऱ्या पायवाटेवर कळसा नाल्याच्या खोऱ्यात ‘मलबार ट्री टॉड’ हा बेडूक आढळून आला. पश्चिम घाटात आढळणाऱ्या या बेडका संदर्भात अधिक माहिती देताना शेटे म्हणाले की, स्थानिक प्रजातीचे हे बेडूक प्रामुख्याने मान्सूनमध्ये आढळून येते आणि त्यानंतर ते नाहीसे होते.
आपली अंडी झाडामध्ये उबवणारे हे एकमेव असे बेडूक आहे ज्याचे झाडांच्या उंच छतावर वास्तव्य असते. संशोधक मंडळींना या बेडकाबद्दल आणि त्याच्या वागणुकीबद्दल फार कमी माहिती आहे असे सांगून बेडकांच्या प्रजातींमध्ये मलबार ट्री टॉड ही बेडके सर्वप्रथम पर्यावरणातील बदलाचे निर्देश देतात आणि निसर्गाच्या साखळीत महत्त्वाची भूमिका निभावत असतात, असे शेटे यांनी स्पष्ट केले.
करंजोळ गोव्याचे वन्यजीव कार्यकर्ते आणि छायाचित्रकार विठोबा गावडे यांनी सांगितले की, कर्नाटकच्या कळसा नाला डॅमिंग आणि डायव्हर्शन प्रोजेक्ट क्षेत्रात हे बेडूक आढळते. मात्र आता पाण्याअभावी नाला कोरडा पडत चालला असल्यामुळे त्याचा प्रतिकूल परिणाम मलबार ट्री टॉड या बेडकांवर होत आहे. शेत पिकांची हानी करणाऱ्या कीटकांचा फडशा पाडण्यात हे बेडूक महत्त्वाची भूमिका पार पाडतात, अशी माहितीही गावडे यांनी दिली.
मलबार ट्री टॉड (पेडोस्टीबीस ट्यूबर्क्युलोसस) अन्नसाखळीचा अंतर्गत भाग असून जो कीटकांची संख्या नियंत्रणात ठेवतो. ज्यामुळे कीटकांच्या मोठ्या हल्ल्यापासून शेतपिकं सुरक्षित राहतात. त्यामुळे बेडकांची ही प्रजाती जिवंत राहणे पर्यावरणासाठी अत्यावश्यक आहे, असे वन्यजीव प्रेमी चंद्रकांत अवखाळे यांनी स्पष्ट केले.