शहरातील वनिता विद्यालय शाळेच्या बाजूला हिंडलग्याकडे जाणाऱ्या रस्त्या शेजारी झाडाझुडपांमध्ये आढळलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनखात्याला पुन्हा एकदा अपयश आले आहे. मोठ्या प्रमाणात फौजफाटा आणि सापळा रचून देखील आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस आणि वनखात्याच्या हातावर तुरी देऊन चलाख बिबट्या रेस कोर्स जंगल परिसरात अदृश्य झाला आहे.
शहरातील वनिता विद्यालय येथून हिंडलग्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज सकाळी एका खाजगी बस चालकाला बिबट्या दिसल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि वन विभाग सतर्क झाला असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम तीव्र केली आहे. यासाठी रेस कोर्स परिसरातील सर्व रस्त्यांची नाकेबंदी करून रहदारीस प्रवेश बंदी करण्यात आली. गेला पंधरावडा वनखात्याशी लपंडाव खेळणाऱ्या बिबट्याचे शहरातून हिंडलग्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज सकाळी दर्शन झाल्याची माहिती व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने रेस कोर्स परिसरातील सर्व शाळा – शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस व वन कर्मचारी रस्त्यावर उतरले असून हिंडलगा रस्त्यावरील परिसरात झाडाझुडपांमध्ये बिबट्याचा कसून शोध घेतला जात होता. त्याचप्रमाणे रेस कोर्सच्या दिशेने तसेच हिंडलग्याकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स टाकून बंद करण्यात आले आहेत. क्लब रोड, सेंट झेवियर्स हायस्कूलकडून हिंडलग्याकडे जाणारा रस्ता वगैरे रस्ते सकाळपासून रहदारीसाठी बंद करण्यात आल्यामुळे या मार्गावर फक्त पोलीस आणि वनखात्याच्या कर्मचाऱ्यांचा वावर दिसून येत होता.
रेस कोर्स परिसरात पुन्हा बिबट्या आढळून आल्याची माहिती मिळताच बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी आदींनी सकाळी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहिमे संदर्भात माहिती घेतली.
पोलिस आणि वन खात्याने बिबट्याची नाकेबंदी करून त्याला पकडण्यासाठी सर्वतोपरी दक्षता घेतली होती. बिबट्यासाठी सापळे ही रचण्यात आले होते. तथापि गेल्या पंधरा दिवसात रेस कोर्ससह आसपासच्या परिसराशी जुळवून घेतलेल्या बिबट्याने सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस व वनखात्याच्या जाळ्यात न अडकता त्यांच्या हातावर तुरी देऊन पुन्हा रेस कोर्स जंगल परिसरात पलायन केले. मिळालेल्या माहितीनुसार अगदी थोडक्यात बिबट्याने सर्वांना चकविले अन्यथा तो जेरबंद झाला असता. पोलिस आणि वनखात्याची अक्षरशः दमछाक करणाऱ्या या हुशार जंगली श्वापदाला पकडण्यासाठी आता दांडेलिहून प्रशिक्षित हत्ती मागविले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
गोल्फ मैदानाजवळ बिबट्याने असा दिला वन खात्याला चकवा व्हीडिओ बेळगाव live pic.twitter.com/R9z1AXrl9G
— Belgaumlive (@belgaumlive) August 22, 2022