रेस कोर्स परिसरात बिबट्याने घर केले आहे हे वनखात्याकडून स्पष्ट झाले आहे,यामुळे या परिसरात सुरू झालेल्या शाळांच्या बाबत काय?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.जाधव नगर येथून बिबट्या रेस कोर्स परिसरात असल्याची समजताच विद्यार्थ्यांच्या खबरदारीच्या दृष्टिकोनातून मागील आठ दिवसापासून 22 शाळांना सुट्टी देण्यात आली होती मात्र दिनांक 16 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या शाळा आता पुन्हा बंद होणार का असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत जिल्हाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नसून येथील भय अजुनही संपत नाही.
सदर बावीस शाळा सुरू झाल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पालक शिक्षक यांना देखील सूचना करण्यात आल्या असून शाळा आवारात विद्यार्थी एकटे फिरणार नाहीत शिवाय शाळांतील वर्ग खोल्यांच्या खिडक्या दरवाजे व्यवस्थित लावून घ्यावे शाळेचा कंपाउंड परिसर देखील सुरक्षित ठेवावा असे सांगण्यात आले आहे.
त्यांचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मार्गदर्शक प्रणाली जाहीर करत या शाळा सुरू करण्यात आले आहेत मात्र पुन्हा या ठिकाणी बिबट्या दिसल्याने नेमक्या शाळा सुरू की बंद याबाबत संबंधित विभागाने स्पष्टता दिलेली नाही.
जाधवनगर या ठिकाणी प्रथम बिबट्याने गवंडी कामगावर हल्ला केल्याचे दिसून आले होते.यामुळे सदर बिबट्या आला कुठून असा प्रश्न निर्माण झाला होता. काकती जंगलातून सदर बिबट्या या ठिकाणी आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
काकती येथून गोल्फ कोर्स परिसरात जाण्यासाठी भुयारी मार्ग असून या ठिकाणी जाधव नगर परिसरात असलेल्या नाल्यातून बिबट्या या ठिकाणी प्रथम दाखल झाला असावा असे देखील बोलले जात आहे. रेस कोर्स जंगल हे साधारण दीडशे दोनशे एकर क्षेत्रात विखुरले असून नेमका बिबट्या कुठे घर करून आहे असा पप्रश्न उपस्थित होत आहे
दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात बिबट्या निदर्शनास आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते मात्र सदर बिबट्या नसून ते रानमांजर असल्याचे वन खात्याने स्पष्ट केले होते. मात्र पुन्हा याबद्दल कोणताच विषय नव्हता यामुळे तेव्हाचाच बिबट्या कि रानमांजर हे या ठिकाणी घर करून आहे का? अशा चर्चा सुरू आहेत. जोपर्यंत बिबट्याला जेरबंद करण्यात येत नाही तोपर्यंत या तर्क वितर्कना पूर्णविराम मिळणार नसून परिणामी गोल्फ कोर्स परिसरातील भय देखील संपणार नाही.