बेळगाव शहराचा पाहुणचार घेण्यासाठी आलेला बिबट्या प्रत्येकाच्या नाकीनऊ आणत आहे! गेल्या १५ दिवसांपासून गोल्फ कोर्स मैदान परिसरात तळ ठोकून असलेल्या बिबट्याने बऱ्याचवेळा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून दर्शन दिले असून युद्धपातळीवर सुरु असलेल्या मिशन बिबट्यातून सहजपणे बिबट्या निसटला आहे.
सोमवारी शिनोळीतील खाजगी कंपनीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या मिनीबस चालकांनी बिबट्याची छबी पुन्हा एकदा मोबाईलमध्ये कैद केली आणि त्यानंतर पुन्हा वनविभाग शोध मोहिमेत सक्रिय झाला आहे.
क्लब रोड परिसरात दिसलेल्या बिबट्यामुळे आज वनविभागाने दिवसभर गांधीचौक ते ज्योती महाविद्यालय परिसरात शोध मोहीम सुरु केली. या मार्गावरून नेहमीच शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र बिबट्याची शोध मोहीम सुरु असल्याने दिवसभर हा रस्ता सामसूम झाला होता.
केवळ वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस विभाग आणि पत्रकार आदींव्यतिरिक्त हा मार्ग आज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. नेहमी गजबजलेल्या या मार्गावर सोमवारी मात्र संपूर्ण दिवसभर शुकशुकाट होता.
सोमवारी दुपारी वन खात्याच्या हातातून बिबट्या निष्ठाण पुन्हा गोल्फ कोर्स जंगल परिसरात गेल्यानंतर वन खात्याने दिवसभर श्वानासह पोलिस वन खात्यांच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी कोंबिंग ऑपरेशन राबवले मात्र सायंकाळी सात पर्यंत तरी बिबट्या वन खात्याचा पिंजऱ्यात अडकला नव्हता त्यामुळे कोंबिंग ऑपरेशन मध्ये सहभागी झालेले वनखात्याचे कर्मचारी सायंकाळी कोर्स मैदान परिसरातून बाहेर परतत होते.
गोल्फ कोर्स जंगलात बसवण्यात आलेले सात पिंजरे आणि वन अधिकाऱ्यांचे फेऱ्या पेट्रोलिंग रात्रभर सुरूच असणार आहेत. मंगळवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम हाती घेतली जाणार आहे .उध्या शोध मोहिमेत हत्ती आणि आणखी विशेष टीम शार्प शूटर सहभागी होणार आहेत.