बेळगाव जायंट्स सखी या संस्थेतर्फे आज प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्याच्या आग्रहास्तव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने सिंगल यूज प्लास्टिकविरोधात मोहीम हाती घेतली होती. पण, महिनाभर मोहीम राबवण्यात आल्यानंतर आता ती बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे यामागचे गौडबंगाल काय, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
महापालिकेकडून सिंगल यूज प्लास्टिक बंदीची मोहीम राबवण्यात आल्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी सिंगल युज प्लास्टिकचा वापर कमी करण्यात आला होता. पण अचानक ही मोहीम थांबविण्यात आली आहे अजूनही अनेक ठिकाणी प्लास्टिकचा वापर सुरूच आहे. त्यामुळे ही मोहीम कायम ठेवणे आवश्यक होते. पण महापालिकेने अचानकपणे ही मोहीम बंद केली आहे.
गेल्या आठवड्यात महापालिकेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांनी बैठक घेतली. त्यामध्ये प्लास्टिक बंदीबाबत सूचना केल्या. त्यावेळी महापालिका आयुक्त डॉ. रूद्रेश घाळी यांनी मोहीम तीव्र करण्यात येईल, असे सांगितले असले तरी महापालिकेने प्लास्टिक बंदी मोहीम तीव्र तर केली नाहीच उलट ती मोहीम स्थगित केली आहेअसे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जगभरात दर सेकंदाला 15,000 प्लास्टिकच्या बाटल्या विकल्या जातात, तर दरवर्षी 26 ते 27 ट्रिलियन प्लास्टिक पिशव्यांचा वापर होतो.यामुळे भविष्यातील संकट ओळखून भारत सरकारने १ जुलैपासून सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली आहे. पॉलिस्टीरिन आणि विस्तारित पॉलिस्टीरिनसह एकेरी वापरल्या जाणार्या प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवणूक, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घालणारा हा आदेश 1 जुलै 2022 पासून लागू केला असला तरी सगळीकडे राजरोसपणे प्लॅस्टिकची विक्री आणि वापर सुरू आहे.तरी आपण यात त्वरित लक्ष घालून प्लॅस्टिक विरोधी मोहीम तीव्रपणे राबवावी अशी विनंती जायंट्स सखीने केली आहे.
यावेळी जायंट्स सखीच्या संस्थापिका-अध्यक्षा ज्योती अनगोळकर, फेडरेशन संचालिका नम्रता महागावकर, उपाध्यक्षा विद्या सरनोबत, सचिव सुलक्षणा शिन्नोळकर, अर्चना कंग्राळकर आदींसह या संस्थेच्या इतर पदाधिकारी उपस्थित होत्या.