जाधवनगर येथील गोल्फ कोर्स मैदान परिसरात दडी मारून बसलेल्या बिबट्याचा 22 दिवस उलटून गेले तरी पोलीस व वनखात्याशी लपंडाव सुरूच आहे. क्षणात दिसून गायब होणाऱ्या त्या चलाख बिबट्याला पकडण्यासाठी असंख्य पोलीस व वन कर्मचारी, तज्ञ शोध पथक हत्तींचा ताफा प्रशिक्षित श्वान पथकं, ट्रॅप कॅमेरे यांच्याद्वारे गेल्या दोन दिवसापासून बृहत शोधमोहीम राबवून देखील बिबट्याला जेरबंद करण्याच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही.
जाधवनगर येथे एका कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाऊन पहिल्यांदा आपले दर्शन देणाऱ्या त्या बिबट्याला पकडण्याचे आतापर्यंत केलेले सर्व प्रयत्न विफल ठरले आहेत. गोल्फ कोर्स मैदानाच्या 150 एकर विस्तृत परिसरातील जंगल सदृश्य प्रदेशाचा फायदा घेत दडून बसलेला बिबट्या काल दुपारी शोध पथकाच्या हातातून निसटून हिंडलगा गणेश मंदिरानजीक दाखल झाला होता. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तेथे त्याला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या तावडीतूनही चालाखीने निसटून बिबट्या पुन्हा गोल्ड कोर्स मैदान जंगल परिसरात फरारी झाला.
सर्वांची पूरती दमछाक करणाऱ्या आणि दहशत निर्माण करणाऱ्या या बिबट्याला पकडण्यासाठी आता ‘ऑपरेशन हनीट्रॅप’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. ऑपरेशन गजराज सुरू असताना त्या मागोमाग सुरू होणारी ऑपरेशन हनीट्रॅप ही मोहीम कुतूहलाचा विषय ठरली आहे. वन्य प्राण्यांच्या बाबतीत मुत्राच्या वासावरून नरमादी एकमेकांना ओळखतात. निसर्ग नियमानुसार नर मादीकडे अथवा मादी नराकडे आकर्षित होते. याचा फायदा बिबट्याला पकडण्यासाठी घेतला जाणार आहे. गोल्फ कोर्स मैदान परिसरात दडी मारलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात अडकविण्यासाठी आता ‘ऑपरेशन हनी ट्रॅप’ म्हणजे थोडक्यात मादी बिबट्याच्या मुत्राची मदत घेतली जाणार आहे. बिबट्याचा वावर असल्याचा संशय असलेल्या भागात पिंजरे बसवून हे मूत्र शिंपडले जाणार आहे.
या अलीकडे विकसित झालेल्या तंत्राद्वारे बिबट्याला पिंजऱ्यात अडकविण्याची योजना आखण्यात आली आहे. यासाठी भूतरामनहट्टी येथील जंगलातील मादी बिबट्याचे मूत्र मागविण्यात आले आहे.
गोल्फ कोर्स मैदानासह एकूण 240 एकर प्रदेशांमध्ये ठराविक ठिकाणी एकूण 8 पिंजरे बसविण्यात आले असून मादी बिबट्याच्या मुत्राच्या सहाय्याने सतत हुलकावणी देणाऱ्या चलाख बिबट्याला पकडण्याची सज्जता करण्यात आली आहे, अशी माहिती एसीएफ मल्लिनाथ कुसनाळ यांनी दिली आहे.