गणेश उत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे.
मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहाला मर्यादा आल्या होत्या. मात्र यंदाचा गणेशोत्सव सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे यामुळे 31 ऑगस्ट रोजी येऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळी जोरात तयारीला लागली आहेत.
गणेशोत्सवाची पहिली पायरी असणाऱ्या मंडपाची मुहूर्तमेढ नुकतीच नारळी पौर्णिमेला पार पडली असून आता गल्लोगल्ली मंडप घालण्याचे काम सुरू आहे. मागील वर्षी कोरोनाच्या काळात गणेश मूर्तींच्या उंचीवर मर्यादा आल्या होत्या. शिवाय सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू नये यासाठी मंडप देखील घालू नये असे आवाहन करून मंदिर शिवाय सार्वजनिक स्थळांमध्ये गणपती बसविण्यात आले होते. मात्र यंदाचा उत्साह ओसंडून वाहत असून मंडप घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सामाजिक संदेश तसेच जनजागृती प्रबोधन करण्याच्या उद्देशाने विविध मंडळांनी योजना आखल्या असून त्या दृष्टिकोनातून मंडपाची उभारणी करण्यात येत आहे.यामुळे आता गणेशोत्सवाचे वेध लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे.प्रामुख्याने बाजारपेठा मागील पंधरा दिवसापासून फुलल्या असल्याने बाजारपेठेतून गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे.आता मंडप उभारणीच्या कामावरून गल्लोगल्ली देखील गणेशोत्सवाचे वेध लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आपला बाप्पा किती उंचीचा आहे.शिवाय आपण कोणत्या पद्धतीने देखावे सादर करणार आहोत या सर्वांचा विचार विनिमय करून मंडळे कामाला लागली आहेत. तत्पूर्वी संबंधित विभागाकडून परवानगी घेत मंडळांनी विद्युत रोषणाई देखील करण्यासाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. यामुळे मागील दोन वर्षापासून साधेपणाने पार पडलेला गणेशोत्सव यंदा मोठ्या जल्लोषात पार पडणार असल्याचे चित्र या मंडप उभारणी वरून पाहायला मिळत आहे.
प्रत्येक मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर आधीपासूनच मंडप बुकिंग करून ठेवले असल्याने केवळ काही दिवसांवर राहिलेला बाप्पाच्या आगमनासाठी आता मंडप उभारणीचे काम सुरू आहे.साधारण बेळगाव शहरात 250 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून यामुळे यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी प्रत्येक रस्त्यांवर मंडप उभारणीचे काम सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.