बेळगाव लाईव्ह विशेष : वृक्षतोड, जंगलांची कमी होत चाललेली संख्या, आणि वाढते सिमेंटीकरण! यामुळे वन्यजीवांचा मोर्चा नागरी वस्त्यांमध्ये वाढू लागला आहे याचा प्रत्यय बेळगाव शहराच्या हद्दीत आलेल्या बिबट्यामुळे नागरिकांना येत आहे. गेल्या ४ दिवसांपूर्वी जाधव नगर परिसरात एका तरुणावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यानंतर ‘मिशन बिबट्या’ वनविभागाने हाती घेतले आहे. मात्र अद्याप बिबट्याचा शोध लागलेलाच नाही.
वनविभाग संवर्धन करण्यास आपण सारेच जण कमी पडत असून आता ते प्रकार सर्रास घडण्याचीही शक्यता आहे. जंगल नष्ट होत चालल्यामुळे आपल्या पोटासाठी शिकार करणाऱ्या मांसाहारी प्राण्यांचा मोर्चा आता जंगलाजवळ असलेल्या गावात वाढत चालला आहे. गावांचेही बहुतांशी प्रमाणात शहरीकरण झाल्याने आता गावागावातून शहराच्या सीमेपर्यंत वन्यप्राणी पोहोचले आहेत हे बिबट्याच्या ‘मिशन बेळगाव’ वरून दिसून येत आहे.
अलीकडे चिकोडीत देखील असाच प्रकार पाहावयास मिळाला होता यानंतर बेळगाव शहरात बिबट्याचे दर्शन झाले असून हि वन्यप्राणी आणि मानव यांच्या संघर्षाची सुरुवात असल्याचे दिसून येत आहे. बेळगावमध्ये झालेल्या बिबट्याच्या दर्शनानंतर वनविभाग आणि स्थानिक वन्यप्रेमींच्या सहयोगाने महत्वपूर्ण कार्य करण्यात येत आहे.
बेळगावमधील जाधव नगर येथे आलेला बिबट्या हा भक्ष्याच्या शोधात आला असावा याशिवाय दुसरे कारण नसावे. आसपास असलेल्या झाडाझुडपांच्या प्रदेशामुळे जी वाट मिळेल त्या वाटेने आपल्या भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याने एका माणसावर हल्ला केला. प्रथमदर्शनी हे रानमांजर असावे असा अंदाज लावण्यात आला. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याची छबी कैद झाली आणि त्यानंतर वनविभाग आणि नागरिक सतर्क झाले. मोक्याच्या ठिकाणी रेसकोर्समध्ये 12 कॅमेरा ट्रॅप बसविण्यात आले आहेत.
रेस कोर्स किंवा गोल्फ मैदान हे बिबट्या साठी लपण्याचे चांगले ठिकाण आहे. त्यात झाडे, झुडपे आणि वनस्पतींचे दाट आच्छादन आहे. यामुळे बिबट्या सुरक्षितपणे राहू शकतो. दाट झाडीत लपलेल्या बिबट्याला शोधण्यात अतिशय सतर्कतेचा आणि दक्षतेची गरज आहे. बिबट्याला पकडण्यासाठी कुत्र्याचा सापळा रचण्यात आला होता मात्र याचा काहीच फायदा झाला नाही. या भागात येण्यापूर्वी बिबट्याने डुकराची शिकार केल्याचे निदर्शनास आले असून पुन्हा या भागात डुकराचा सापळा लावून बिबट्याला कैद करता येणे शक्य आहे.
वनविभाग निरंतरपणे, आजूबाजूच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवून, रात्रंदिवस कौतुकास्पद कामगिरी करत असून बिबट्याला जिवंत पकडून सुरक्षित ठिकाणी सोडणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. या भागात वावरताना एकट्याने वावरणे टाळावे, लहान मुलांना या भागात संचारासाठी परवानगी देऊ नये, तसेच बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी अतिआत्मविशास दाखवू नये, शिवाय वनविभागाच्या कार्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची काळजी घेणे हि नागरिकांची जबाबदारी आहे. याशिवाय प्रसारमाध्यमांनीही वनविभागाच्या कार्यात अडथळा येणार नाही याची खबरदारी घेणेही तितकेच गरजेचे आहे.
बिबट्याच्या शोध मोहिमेसाठी हाय एन्ड कॅमेरे आसपासच्या इमारतींवर बसविण्यात आले असून बिबट्याचा शोध घेऊन त्याला सुरक्षितपणे, सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यात येणार आहे, अशी माहिती वनविभागाने दिली आहे.
अन्न व पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत मोर्चा वळविण्याचा हा पहिलाच प्रकार नसून यापूर्वी अनेक वेळा असे प्रकार घडले आहेत. असे प्राणी दृष्टीस पडले तर कोणती काळजी घ्यावी, वन्यप्राणी मानवी वस्तीत येऊ नये यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत वन विभागाकडून नागरिकांमध्ये जागृती होणेही आवश्यक आहे. बेसुमार वृक्षतोड थांबवून निसर्गासह वन्यप्राण्यांच्या जीवाशी खेळणे मनुष्याने थांबविले नाही तर लवकरच जंगलातील वन्यप्राणी सिमेंटीकरणाच्या जंगलात आपले बस्तान बसवतील यात तिळमात्र शंका नाही!