विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या व बौद्धिक दृष्ट्या सशक्त बनला पाहिजे, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी कोणतातरी खेळ खेळत राहिला पाहिजे यासाठी निवृत्तीनंतर उर्वरित वेळ विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मी झिजत राहीन असे भावनिक उदगार सत्काराला उत्तर देताना वाय. सी. गोरल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि ऐकणाऱ्यां साऱ्या श्रोत्यांना त्यांचे मनापासून व्यक्त झालेले विचार खूप आवडले.
येळ्ळूर येथील सैनिक भवन मध्ये सन्मित्र परिवाराच्यावतीने येळ्ळूरचे भूषण जिल्हा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार सन्मानित श्री वाय. सी. गोरल हे 37 वर्षाच्या प्रदीर्घ शिक्षकी सेवेनंतर निवृत्त झाले. यानिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष येळ्ळूर ग्रामपंचायतचे अध्यक्ष व सन्मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील आपल्या अध्यक्षीय भाषणात सदिच्छा देताना म्हणाले की खेळाडूंना घडविण्याबरोबरच त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी सरांनी मेहनत घेऊन शेकडो विद्यार्थ्यांना क्रीडाक्षेत्राबरोबर त्यांचे करिअर चांगल्या रीतीने व्हावे यासाठी सतत प्रयत्न करत असतात असे विचार त्यांनी मांडले.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र हायस्कूलच्या मुलींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सत्कारमूर्ती वाय. सी. गोरल यांचा प्रदीप मेणसे, चांगाप्पा करलेकर, ज्योतिबा बेडरे, गजानन उघाडे आणि दिनेश घाडी यांनी ‘गुरुवंदना’ हा कार्यक्रम केला. त्यानंतर सन्मित्र मल्टीपर्पजचे व्हॉइस चेअरमन राजकुमार पाटील यांनी सरांनी केलेल्या सेवेचा आढावा, व शिक्षकी सेवेत त्यांचा अनुभव याविषयीची माहिती आपल्या प्रस्तावनेत मांडली. कार्यक्रमात नितीन गोरल, चांगाप्पा कर्लेकर, परशुराम मंगनाईक, रमेश घाडी, नारायण उडकेकर, एन.डी.गोरे, उदय जाधव बाबुराव मुरकुटे, मधु पाटील, सी.बी. बागेवाडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व कौतुक केले.
सन्मित्र परिवार व सन्मित्र मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने सरांना शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने,व सैनिक मल्टीपर्पज सोसायटी, येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव जिल्हा खो-खो संघटना, बेळगाव कुस्तीगीर संघटना, नवहिंद मल्टीपर्पज सोसायटी , नवहिंद परिवार येळ्ळूर, मराठी ग्रामीण साहित्य संघ,येळ्ळूर, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना, मॉर्निंग वॉकिंग संघटना वडगाव, स्वामी विवेकानंद सोसायटी आणि सार्थक सोसायटी बेळगाव अशा अनेक संस्थेच्या वतीने,सामाजिक संघटनेच्या वतीने आणि विविध क्षेत्रातील मित्रमंडळांच्या हस्ते सरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश पाटील प्रमुख पाहूणे, विश्वास पवार, उदय जाधव, एन.डी. गोरे, गजानन उघाडे हे होते.
कार्यक्रमाला माजी आमदार मनोहर किणेकर, संतोष मंडलिक, जे. एस. नांदुरकर, विलास घाडी असे अनेक शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि आजी-माजी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल हुंदरे यांनी केले. तर सर्वांचे आभार महेश जाधव यांनी मानले.