बेळगाव शहर परिसरासह ग्रामीण भागात आज मंगळवारी नागपंचमी सण भक्तीभावाने साजरा होत असताना शेतकऱ्यांनीही पारंपारिक पद्धतीने हा सण साजरा केला.
शेतकऱ्यांच मातीशी नातं असल्याने नागपंचमीत शेतकरी आपल्या घरी काळ्या मातीत मढवीलेली मुर्ती भोपळ्याच्या पानात व चाळणीत ठेऊन घरी आणतात.
सणादिवशी पुजा करुन ती श्री गणेश चतुर्थीला मुर्तीच्या बाजूला ठेऊन अनंत चतुर्थीदिवशी त्या नागमूर्तिचेही विसर्जन केल जाते. या परंपरेनुसार नागपंचमी निमित्त आज शेतकऱ्यांनी घरी नाग मूर्तींची प्रतिष्ठापना करून सण साजरा केला.
माती आणि पाणी यांचा मेळ शेतकऱ्यांच्या जिवनाशी निगडीत आहे. लोहार किंवा सुतार यांच्या कडून मुर्ती आणतानां पानवीडा, अक्षता, बिदागी देऊन भोपळ्याच्या पानातून नागमुर्ती आणली जाते. भोपळ्याच्या पानातून मूर्ती आणण्याचे कारण असे की काळी माती वाळली की लवकर भेगा पडून मुर्ती फुटू शकते.
मात्र ती भोपळ्याच्या पानावर ठेवल्यास त्या पानाला जे बारिक काटे असतात ते मातीत शिरतात. त्यामुळे मुर्तीला भेगा पडत नाहीत. त्याचबरोबर नागमूर्ती विशेषत: लहान मुलांच्या हातून घरी आणली जाते.
तेंव्हा त्यांच्या हातात चाळण, पसरट डबा अथवा ताट दिली जाते. नागमूर्ती मुलांच्या हातातून पडून सणादिवशी अपशकुन घडू नये यासाठी हे केले जाते.