अपुरी, अवैज्ञानिक आणि निकृष्ट दर्जाची विकास कामे हे बेळगावातील स्मार्ट सिटी योजनेचे अपयश आहे असे सांगून ताशेरे ओढताना बेळगाव महापौर निवडणुकीला विलंब हा भाजप नगरसेवकांवर झालेला मोठा अन्याय आहे, असे परखड मत काँग्रेस नेते माजी आमदार रमेश कुडची यांनी व्यक्त केले.
आगामी विधानसभा निवडणूक, बेळगाव स्मार्ट सिटी योजना आणि प्रलंबित महापौर निवडणूक यासंदर्भात आज बुधवारी सकाळी बेळगाव लाईव्ह प्रतिनिधीच्या प्रश्नांना उत्तर देताना माजी आमदार कुडची यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.कुडची यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी,एम जी प्रदीप,सरला सातपुते, बसवराज शेगावी आदी उपस्थित होते.
केंद्र व राज्य सरकारने संयुक्तरीत्या बेळगाव शहराला उत्तम नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, तथापि स्मार्ट सिटी योजनेद्वारे बेळगावचा सुंदर स्वच्छ शहरात कायापालट करण्याऐवजी शहराची दुरावस्था करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीची विकासकामे एकतर अपुरे आहेत किंवा निकृष्ट दर्जाची अवैज्ञानिक झाली आहेत. स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात 1 लाख 5 हजार लोकांची आजमावलेली मतं गृहीत न धरता मनमानी विकास कामे का राबविण्यात आली? असा सवाल करून रमेश कुडची यांनी कॉलेज रोडचे उदाहरण दिले.
कॉलेज रोडवर एकाच ठिकाणी ड्रेनेज, पाणी, गॅस आणि इलेक्ट्रिसिटी यांच्या पाईपलाईन अवैज्ञानिक पद्धतीने एकावर एक घालण्यात आले आहेत. या सर्व पाईपलाईनसाठी चेंबरही बांधण्यात आलेला नाही. सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे एखाद्या दुर्घटनेस या पाईपलाईन कारणीभूत ठरल्यास त्याला कोण जबाबदार? सदर विकास काम पूर्ण होऊन 5 वर्ष होत आली मात्र अद्यापपर्यंत त्या पाईपलाईन मधून पाणी, गॅस, इलेक्ट्रिसिटी काहींही सुरू झालेले नाही. याला स्मार्ट सिटी योजनेचे अपयश म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? असा सवाल ही त्यांनी केला.
बेळगाव शहर स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट होण्याचे सर्व श्रेय बेळगाव शहरवासीयांना जाते लोकप्रतिनिधींचा यामध्ये काहीही संबंध नाही स्थानिक लोकप्रतिनिधींनी ही योजना मंजूर करून घेतली असे म्हणणे साफ चुकीचे आहे असे सांगून केंद्र सरकारकडून ही योजना बहुमान स्वरूपात बेळगावला मिळालेली आहे असे ते म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीपासून माजी आमदार रमेश कुडची आपली दुसरी इनिंग सुरू करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना माझा तसा विचार नाही. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विनंती केली तर त्यांना माझा होकार असेल आणि जर दुसऱ्या कोणाला उमेदवारी दिली तर त्यालाही माझी काही हरकतही असणार नाही असे असे सांगून आजतागायत निवडणुकीच्या उमेदवारीसाठी मी कोणाकडेही मागणी केलेली नाही असे कुडची यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे उमेदवारी मिळाली तर कोणत्या मतदारसंघातून इच्छुक आहात? या प्रश्नाला उत्तर देताना मतदार संघाचा प्रश्नच येत नाही असे सांगून 1956 नंतर बेळगाव मध्ये 1999 आणि 2004 साली मी म. ए. समिती उमेदवाराला पराभूत करून विजयी झालो. त्यावेळी आमदार यानात्याने बेळगाव उत्तर आणि दक्षिण दोन्हीही मतदारसंघ माझ्याकडेच होते. त्यामुळे कोणत्याही मतदारसंघातून मी उभा राहू शकतो, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रलंबित महापौर निवडणुकी संदर्भात बोलताना केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्याचप्रमाणे बेळगाव गावात त्यांचेच आमदार आणि त्यांचेच जास्तीत जास्त नगरसेवक असतानाही बेळगाव महापौर निवडणूक घेतली जात नाही याचा अर्थ निवडून आलेल्या नगरसेवकांवर अन्याय करणारे त्यांचे नेतेच आहेत. ही गंभीर बाब भाजपच्या नगरसेवकांनी लक्षात घेतली पाहिजे, असेही माजी आमदार रमेश कुडची यांनी स्पष्ट केले.
प्रलंबित महापौर निवडणूक हा भाजप नगरसेवकांवर झालेला अन्याय -रमेश कुडची@JarkiholiSatish @KPCCPresident
@firojseth pic.twitter.com/uqKelaXscG— Belgaumlive (@belgaumlive) August 24, 2022