बेळगावमध्ये रविवारपासून मुसळधार पाऊस पडत असून या पावसामुळे बेळगाव शहर आणि परिसरातील अनेक भागात पडझडीचे सत्र सुरु आहे. ग्रामीण भागात देखील अशीच परिस्थिती आहे. शहरातील भारतनगर, वडगाव, अनगोळ आणि भातकांडे गल्ली या परिसरात घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसामुळे अनगोळ भागातील अशोक भेंडिगेरी यांच्या मालकीचे घर कोसळुन या घरात राहणाऱ्या शिवाप्पा कोप्पद आणि शीतल हुनासिकट्टी या भाडेकरूंचे मोठे नुकसान झाले आहे.
संपूर्ण घर जमीनदोस्त झाले असून बिकट परिस्थितीतून आयुष्याचा गाडा ओढणाऱ्या या कुटुंबांवर निसर्गाचा प्रकोप झाला आहे. सदर कुटुंबियांना माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी प्रत्येकी ५००० रुपयांची आर्थिक मदत केली असून समाजातील दानशूर व्यक्तींनी नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
दोन्ही कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बिकट असून वॉचमन आणि मोलमजुरी करून यांचा चरितार्थ चालतो.
समाजातील ज्या दानशूर व्यक्तींना नुकसानग्रस्तांची मदत करावयाची आहे
त्यांनी खाली दिलेल्या संपर्क क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
शिवाप्पा गंगाप्पा कोप्पद, सागर शिवाप्पा कोप्पद : ६३६६३१६०७५, शीतल हुनासिकट्टी : ८२१७६४६२०८.