Friday, December 27, 2024

/

बेळगावात दुसरे राष्ट्रीय कायदा विद्यापीठ स्थापनेची मागणी

 belgaum

उत्तर कर्नाटकात बेळगाव येथे दुसरे राष्ट्रीय कायदा विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रभू यतनट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी सकाळी असंख्य वकिलांनी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरित मुख्यमंत्र्यांकडे धाडण्याचे आश्वासन दिले. उत्तर कर्नाटकातील बेळगावला कर्नाटक राज्याची दुसरी राजधानी म्हंटले जाते. बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे राज्य विधिमंडळाची सातत्यपूर्ण अधिवेशने होत असतात. बेळगावपासून एक्सप्रेस वे मार्गे वाहनाने अवघ्या 45 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या धारवाड येथे कर्नाटक उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी पीठ आहे.

बेळगावात लष्कर आणि हवाई दलाच्या केंद्रांसह 1932 साली स्थापलेले मिलिटरी कॅन्टोन्मेंट आहे. याखेरीज हे शहर उद्योग आणि शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. येथील विमान स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे 1942 पासून कार्यरत आहे. आज बेळगावच्या विमानतळावरून दिल्ली, मुंबई, बेंगलोर आदी देशातील मुख्य शहरांना दररोज सुमारे 30 विमान फेऱ्या सुरू असतात. केंद्र सरकारने सुरू केलेल्या 100 स्मार्ट सिटी मिशनमध्ये बेळगावचा अंतर्भाव आहे.

बेळगावातील बऱ्याच शैक्षणिक संस्थांना 100 वर्षांपूर्वीपासूनची परंपरा आहे. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयु), राणी चन्नम्मा विद्यापीठ (आरसीयु) आणि अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च यासारखी विद्यापीठे असलेल्या या शहरात 1939 साली आर. एल. लॉ कॉलेज हे महाविद्यालय आहे. कायदा शिक्षणाचे केंद्र असलेल्या या महाविद्यालयाने अनेक नामवंत वकील आणि न्यायाधीश घडविले आहेत. ज्यामध्ये विद्यमान ऍटर्नी जनरल ऑफ इंडिया के. के. वेणूगोपाल भारताचे माजी सरन्यायाधीश ई. एस. व्यंकटरामय्या, राजेंद्र बाबू, न्यायाधीश बन्नूरमठ, न्या. व्ही. एस. सालीमठ, न्या. डी. पी. हिरेमठ, न्या. ए. बी. पाच्छापूर, न्या. मोहम्मद अन्वर, न्या. पी. ए. कुलकर्णी आदींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध राजकारणी माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई, जे. एच. पटेल, माजी केंद्रीय मंत्री बी शंकरानंद, डी. बी. चंद्रगौडा, राज्याचे माजी कायदामंत्री सुरेश अंगडी आदी बरेच मान्यवर एक तर बेळगावचे आहेत अथवा त्यांनी बेळगाव शिक्षण घेतले आहे.Law university

या खेरीज बेळगाव जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये कायदा महाविद्यालय सुरू आहेत. यासर्व बाबी ध्यानात घेऊन राज्य सरकारने बेळगाव येथे दुसरे राष्ट्रीय कायदा विद्यापीठ सुरू करावे अशी उत्तर कर्नाटकातील जनतेची अपेक्षा आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा संदर्भही देण्यात आला असून बेळगावात दुसरे राष्ट्रीय कायदा विद्यापीठ स्थापनेची मागणी करण्यात आली आहे.

निवेदन सादर करतेवेळी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रभू यतनट्टी यांच्यासह सरचिटणीस ॲड. जी एन पाटील, उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, ॲड. सचिन शिवन्नावर, ॲड. मारुती जिरली, ॲड. सदानंद हिरेमठ, ॲड. विनोद पाटील, ॲड. विजय गेंजी, ॲड. मारुती कामान्नाचे, ॲड. पूजा पाटील आदींसह असंख्य वकील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.