बेळगाव शहरात अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झाली असून नुकसानग्रस्त कुटुंबीयांची व्यवस्था मंडळी रोड येथील कैवल्य योग मंदिर येथे करण्यात आली असून येथील निवारा केंद्राला आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी भेट देऊन नुकसानग्रस्तांना दिलासा दिला.
अतिवृष्टीच्या तडाख्याने घरे गमावलेल्या नुकसानग्रस्त कुटुंबियांना आज महानगरपालिकेच्या वतीने फूड किटचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याहस्ते या किटचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या निवारा केंद्रातील व्यवस्थांची पडताळणी केली. या निवारा केंद्रात सध्या १५ जण आसरा घेत असून त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला आणि मुलांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत.
नुकसानग्रस्त कुटुंबियांना निश्चित भरपाई दिली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून काही कुटुंबीयांकडे कागदपत्रे नसल्याने भरपाई देण्यात विलंब होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, उपयुक्त भाग्यश्री हुग्गी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.