महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गटार तुंबून मुसळधार पावसाच्या पाण्यासह दुर्गंधीयुक्त सांडपाणी केरकचरा मंदिर आणि घराघरात शिरल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना आज सायंकाळी संभाजीनगर वडगाव येथे घडली.
गेले कांही दिवस विश्रांती घेतलेल्या मुसळधार पावसाने बेळगाव शहर परिसरात आज दुपारनंतर अचानक पुन्हा हजेरी लावली. पावसाच्या जोरदार हजेरीमुळे संभाजीनगर वडगाव येथील श्री गणपती मंदिर रस्त्यावरील एका बाजूची गटार तुंबून सांडपाणी व गैरकचरा थेट काही घरांमध्ये शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सचिन बांदिवडेकर, प्रसाद येळ्ळूरकर, अरुण लोहार आदींच्या घरात सांडपाण्याने प्रवेश केला होता.
गल्लीतील गणपती मंदिरामध्ये देखील ओव्हर फ्लो झालेल्या गटारीतील सांडपाण्याने प्रवेश केला. घरांच्या दारातच मोठ्या प्रमाणात गटारीचे पाणी साचून राहिल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. सचिन बांदिवडेकर यांनी आपल्या घरी श्री गणेश मूर्ती विक्री ठेवल्या आहेत. त्या ठिकाणीही घोटाभर गटारीतील सांडपाणी साचून मोठी गैरसोय झाली होती. तथापि प्रसंगावधान राखून बांदिवडेकर यांनी वेळीच जमिनीवरील श्रीमूर्ती उंचावर ठेवल्यामुळे सुदैवाने नुकसान टळले.
मुसळधार पावसामुळे संभाजीनगर येथील सदर रस्त्याची गटार यापूर्वीही तुंबून घराघरात पाणी शिरण्याची घटना घडली होती. त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी पुढाकार घेऊन महापालिकेकडे संबंधित गटार स्वच्छ करण्याची मागणी केली होती. दोन दिवसांपूर्वी महापालिकेचे अधिकारी मुद्देनावर यांना फोटोसह गटारीबाबत तक्रार करून साचलेला गाळ, माती व केरकचरा काढून गटारीची तात्काळ सफाई करावी अशी विनंती संतोष पवार यांनी केली होती.
त्यावेळी त्यांना गटार त्वरित स्वच्छ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या आश्वासनाची अंमलबजावणीच न झाल्यामुळे आज संबंधित गटार पुन्हा तुंबून गैरसोय होण्याबरोबरच मनस्ताप करून घेण्याची वेळ आल्यामुळे संभाजीनगर गणपती मंदिर रस्त्यावरील नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत आहे.