बेळगाव ते चोर्ला रस्त्याच्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात आला असून त्या ऐवजी सदर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण केले जाणार आहे.
गेल्या कांही महिन्यांपासून खानापूर -चोर्ला रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र खानापूर तालुक्यातील कांही भागात सतत पाऊस पडतो. त्यामुळे या ठिकाणी दर्जेदार रस्त्यांची गरज असल्याचे लक्षात घेऊन सदर मार्गाचे कॉंक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे रस्त्याचे आयुष्य वाढेल व रस्ता खराब होणार नाही असा तज्ञांचा अभिप्राय आहे.
गेल्या आठवड्यात जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या विकास कामांच्या आढावा बैठकीत बेळगाव -चोर्ला रस्त्याविषयी चर्चा झाली. त्यावेळी तज्ज्ञांनी व वनविभागाने मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे डांबरी रस्ता फार काळ तग धरू शकणार नसल्यामुळे त्याऐवजी रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करावे असे मत मांडले होते.
त्याला पालकमंत्र्यांनी संमती देऊन सुधारित प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली आहे. आता त्यानुसार कृती आराखडा तयार करून सुधारित प्रस्ताव केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पाठवल्या जाणार आहे. केंद्रीय मंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर सुधारित प्रस्तावानुसार पुढील कार्यवाही होणार आहे.