स्वावलंबी भारत, मेक इन इंडिया, मेड इन इंडिया अंतर्गत संरक्षण खात्याशी निगडित वाहन निर्मिती उद्योग बेळगाव येथे सुरू करण्यात यावा, अशी विनंती वजा मागणी भाजप कर्नाटक राज्य भाजप ओबीसी मोर्चाचे सेक्रेटरी किरण जाधव यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे केली आहे.
नवी दिल्ली येथे केंद्रीय संरक्षण मंत्र्यांच्या भेटीप्रसंगी किरण जाधव यांनी उपरोक्त मागणी केली. जमिनीत पेरलेल्या भूसुरंग तपासणीसाठी लागणाऱ्या तसेच संरक्षण खात्याशी निगडित इतर महत्त्वाच्या कामासाठी लागणाऱ्या बंदुकीच्या गोळ्या आणि बॉम्ब हल्ला प्रतिबंधक सुसज्ज वाहन निर्मितीचा कारखाना बेळगावमध्ये सुरू केला जावा अशी विनंती वजा मागणी किरण जाधव यांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे केली आहे.
यावेळी राजनाथ सिंग यांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करताना जाधव यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार केला जाईल अशी ग्वाही दिली आहे.
बेळगावमध्ये संरक्षण दलाशी निगडित वाहन निर्मितीचा कारखाना सुरू झाल्यास या भागातील सुमारे अडीच ते तीन हजार बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्षम भारत निर्मितीचे स्वप्नही पूर्ण होण्यास हातभार लागेल असे किरण जाधव यांनी बेळगावात प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
उद्यमबाग परिसरातील कांही कारखानदारांनी या वाहन निर्मिती उद्योग उभारणीत सक्रिय सहभागी होण्याची तयारीही दर्शवली असल्याचे किरण जाधव यांनी स्पष्ट केले.