राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीसह चक्क ऑलम्पिक सारख्या अत्यंत प्रतिष्ठेच्या जगप्रसिद्ध स्पर्धेमध्ये बेळगावचे दिग्गज खेळाडू खेळले आहेत. या खेळाडूंनी बेळगावचे नांव उज्वल केले म्हणून बेळगाव हे क्रीडा क्षेत्रातील कर्नाटकाचा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाते.
एकेकाळी मैदानी खेळाला इतके महत्त्व होते की त्यावेळी मैदाने गजबजून गेलेली असायची. शहरातील आनंदवाडी आखाडा असो अथवा ग्रामीण भागामधील आखाड्यांमध्ये मोठे डाव खेळले जात व कुस्त्या पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत असे. सद्य परिस्थिती पाहता बेळगाव शहरात व ग्रामीण भागात आता कुस्त्यांच्या तालमी कमी झालेत आणि आधुनिक जिम उदयाला आले आहेत.
बेळगाव सारख्या छोट्याशा शहरात क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, खो-खो, कबड्डी, अथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिस, जुडो व कराटे हे सर्वात लोकप्रिय खेळ होत. कांही दशकांपूर्वी बेळगावमध्ये या खेळांबरोबरच टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धांचे सतत आयोजन केले जायचे. रविवारी तर एका मैदानाच्या चार-पाच खेळपट्ट्यांवर टेनिसबॉल क्रिकेट सामने आजही सुरू असतात. क्रिकेटसाठी युनियन जिमखाना, सरदार मैदान, व्हॅक्सिन डेपो व संभाजी मैदान ही मैदाना विशेष करून क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहेत याखेरीज शहरात सीपीएड मैदान, काटा मैदान कॅन्टोन्मेंट मैदान ही मैदानही आहेत. मात्र आता कांही मैदानांचा राजकीय, व्यवसाय, खाजगी कार्यक्रमाकरिता वापर केला जातो.
शाळा- महाविद्यालय करिता मैदाने आहेत, परंतु तिथे तासाप्रमाणे मुलांना मैदानात पाठविले जाते. त्याचबरोबर वार्षिक क्रीडामहोत्सव भरवले जातात. क्रिकेट करिता नामांकित असलेले मैदान म्हणजे युनियन जिमखाना या मैदानावर लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा भरविले जातात.या युनियन जिमखाना मैदानावर 1961 साली मुंबई विरुद्ध पुणे सामना झाला होता. या सामन्यामध्ये, रमाकांत देसाई, दिलीप सरदेसाई यांच्यासारखे दिग्गज खेळाडू खेळले होते. त्याचबरोबर सुनील गावस्कर, गुंडाप्पा एकनाथ सोलकर, सय्यद किरमाणी, रॉजर बिन्नी, रवी शास्त्री, शिवलाल यादव, सदानंद विश्वनाथ, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ असे अनेक दिग्गज खेळाडू या मैदानावर खेळलेले आहेत. युनियन जिमखाना मैदानावर टी-ट्वेंटी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा सातत्याने भरवल्या जात असतात. पण आता आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी ऑटोनगर येथे नवे केएससीए स्टेडियम बांधण्यात आले आहे. तेथे विभागीय तसेच रणजी व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होत असतात. पूर्वी गोव्याच्या रणजी क्रिकेट संघामध्ये बेळगावचे बरेच खेळाडू असायचे. अगदी अलीकडे मिलिंद चव्हाण गोवा संघातून खेळला. त्याशिवाय बेळगावचे दीपक चौगुले आणि रोनित मोरे हे कर्नाटक रणजी संघातून खेळले आहेत. रोनित मोरे तर आयपीएलमध्येही खेळतो.बॉडी बिल्डिंग मध्ये सुनील आपटेकर, रणजित किल्लेकर आदींनी बेळगावचे नाव देश विदेशात उज्वल केले आहे.याशिवाय खुराश या खेळात तुरमुरीच्या मलप्रभा जाधव हिने आशिया पदक मिळवत आणि ज्यूडो मध्ये रोहिणी पाटील यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धात बेळगावचे नाव उज्वल केले आहे.
बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर आहे. या सेंटरने अव्वल दर्जाचे क्रीडापटू निर्माण केले असून त्यामुळे बेळगावचे नांव ऑलिम्पिकमध्ये झळकले. या सेंटरचे धावपटू पी.डी. चौगुले, हॉकीपटू बंडू पाटील, शंकर लक्ष्मण ऑलिम्पिकमध्ये खेळले. मूळचे शेरी गल्ली बेळगावचे फड्याप्पा दऱ्याप्पा चौगुले हे भारतातर्फे ऑलिम्पिक मॅरेथॉनमध्ये भाग घेणारे ते पहिले धावपटू होत. 1920 च्या अँटवर्प (बेल्जियम) ऑलिंपिक स्पर्धेतील मॅरेथॉन शर्यतीत त्यांनी 19 वा क्रमांक मिळवला होता. त्याचबरोबर चव्हाट गल्ली बेळगावचे ऑलिम्पियन हॉकीपटू बंडू पाटील हे 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवलेल्या आणि 1964 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवलेल्या भारतीय संघातून खेळले होते. बंडू पाटील 1956, 1960 आणि 1964 च्या ऑलिंपिकमध्ये भारतीय संघातून खेळले होते. त्यांना एक रौप्य आणि दोन सुवर्ण पदके मिळाली आहेत.
बेळगावचा मुष्टियोद्धा मुकुंद किल्लेकर यानेही भारतातर्फे ऑलिम्पिकमध्ये आपले नाव कोरले आहे. कंग्राळीचा मल्ल मोहन रामचंद्र पाटील यानेही 1993 च्या बार्सिलोना ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. एकेकाळी बेळगावमध्ये खो-खोची क्रेझ आगळीवेगळीच होती. खोखोमध्ये बेळगावचे नांव राष्ट्रीय स्तरावर गाजवणारा ग्रामीण भाग म्हणजे कडोली हे गाव होय. श्यामला पाटील, शांता गडकरी, वंदना पाटील अशा अव्वल खो-खोपटू कडोली येथूनच तयार झाल्या. श्यामला पाटील हिला एकलव्य पुरस्कार मिळाला तर वंदना पाटील राष्ट्रीय खो-खो संघाची प्रशिक्षिका झाली. या दोघीही सख्ख्या बहिणी असून त्या दोघी उच्च पदावर कार्यरत आहेत.
टिळकवाडीतील लेले मैदान हे फुटबॉलचे प्रमुख ठिकाण आहे. तिथे आजही फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या जातात. बेळगावचे नांव फुटबॉलमध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले आहे. फुटबॉलमध्ये अमेरिकेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेली बेळगावची कन्या धनश्री कदम हिने आपले नांव सांघिक खेळामध्ये कोरले आहे. कॅम्पमधील सय्यद मैदानावर हॉकी स्पर्धा आयोजित केल्या जातात. मात्र सध्या हॉकीसाठी योग्य प्रशिक्षित व मैदान नसल्याने बेळगावचे खेळाडू हॉकीकडे पाठ फिरवत आहेत. बेळगावमध्ये अव्वल दर्जाचे बॅडमिंटनपटू, टेबल टेनिसपटू, कराटेपटू, फुटबॉलपटू, बुद्धिबळपटू तयार झाले. सध्या ‘खेलो इंडिया’ मध्ये अक्षता कामतीने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकविले आहे तर ज्युडो, व जलतरण प्रकारात कुशल लोहार, स्वरूप धनुचे वगैरे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक नामवंत खेळाडूंनी राज्य, राष्ट्र आंतरराष्ट्रीय व ऑलम्पिकस्तरावर आपल्या बेळगावच नांव कोरले गेले आहे, म्हणूनच कर्नाटकात बेळगाव हे क्रीडा क्षेत्रात अव्वल म्हणून ओळखले जाते.