राकसकोप जलाशय ओव्हर फ्लो होण्यास 5 फूट बाकी असताना कंग्राळी खुर्द येथील पुलाच्या ठिकाणी मार्कंडेय नदीतील पाणी पात्रा बाहेर वाहण्यास सुरुवात झाली आहे.
पावसाळ्याला सुरुवात होऊन महिन्याभराचा कालावधी उलटला असला तरी गेल्या कांही दिवसापासून दररोज मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी मार्कंडेय नदी गेल्या दोन दिवसापासून तुडुंब भरून वाहत होती.
आता पावसाची गती आणखी वाढल्यामुळे मार्कंडेय नदी पात्रा बाहेर वाहण्यास सुरुवात झाली आहे. कंग्राळी खुर्द येथील पुलाच्या ठिकाणी नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात पात्रा बाहेर पडून आसपासच्या परिसरात वाहताना पहावयास मिळत होते.
राकसकोप जलाशयापासून सुरू झालेली मार्कंडेय नदी सोनोली, उचगाव, हिंडलगा, कंग्राळी, जाफरवाडी कडोली, होनगा या मार्गाने वाहते.
या नदीच्या काठी मोठ्या प्रमाणात शेती आहे. येथील शेतकरी दरवर्षी भात रताळी तसेच अन्य पिके घेतात. आता दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्कंडेय नदीचे पाणी पात्रा बाहेर पडल्यामुळे नदीकाठच्या शेत पिकांना धोका निर्माण झाला आहे.