महाराष्ट्रातील घाट प्रदेशासह पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या पावसामुळे कृष्णा आणि अन्य उपनद्यांच्या पाणी पातळीत आज सोमवारी 2 फुटाने वाढ झाली असून नदीकाठच्या जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत.
महाराष्ट्रातील पश्चिम घाट, कोयना जलाशय प्रदेश आदी ठिकाणांसह कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस पडत आहे. यामुळे चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा या नद्यांची पाणीपातळी एका दिवसात 2 फुटाने वाढली आहे. परिणामी नद्यांची पाणी पातळी क्षणाक्षणाला वाढत असल्यामुळे काठावरील प्रदेशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या सर्व नद्यांच्या काठावरील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. ऊस, सोयाबीन, शेंगा, मका आदी विविध पिके पाण्याखाली जाऊन संपूर्णपणे नष्ट झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
वारणा, पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगा या कृष्णा नदीच्या उपनद्या सध्या दुधडी भरून वाहत आहेत. त्यामुळे स्वाभाविकच कृष्णा नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे. कृष्णला पूर आल्यास कागवाड तालुक्यातील मंगावती, जुगुळ, शहापूर, मोळवाड, कुसनाळ, कृष्णाकित्तूरसह आठ गावांना मोठा फटका बसतो याची दखल घेत तालुका प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे.
वेदगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याने सिदनाळ बंधारा पाण्याखाली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक शनिवारी सायंकाळपासून बंद ठेवण्यात आली आहे. चिखली बंधारा, कुन्नूर भागातील दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
दरम्यान, तालुका प्रशासनाच्या अहवालानुसार नदीत 2 लाख क्युसेक्स पाण्याचा प्रवाह आल्यास कृष्णा नदी धोक्याची पातळी ओलांडते. मात्र सध्या 75 हजार क्युसेक्स विसर्ग होत आहे. यामुळे धोकादायक स्थिती नसली तरी सर्वांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.