काकती येथील ‘हा माझा धर्म’ पशू बचाव दलातर्फे सलग दुसऱ्या वर्षी आयोजित ऑनलाइन वारकरी वेशभूषा स्पर्धा नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली.
आषाढी एकादशीनिमित्त हा माझा धर्म पशू बचाव दलातर्फे घेण्यात आलेल्या या ऑनलाईन वारकरी वेशभूषा स्पर्धेत 100 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. बेळगाव परिसरासह ठाणे, कोल्हापूर, पंढरपूर आळंदी येथून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
त्यामध्ये 3 महिन्यांच्या तान्ह्या बाळापासून ते 61 वर्षांच्या आजीबाईंचा समावेश होता. स्पर्धेमध्ये वैजनाथ श्रीनाथ पाटील (कंग्राळी खुर्द), प्रणवी प्रशांत माळवी (खासबाग) आणि वल्लभ संदीप शिंदे ( महागाव, गडहिंग्लज) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेची एक अट होती की झाड लावताना एक फोटो पाठविणे अनिवार्य होते. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रत्यक्षरीत्या 100 हून अधिक झाडे लावण्यात हा माझा धर्म संघटनेला यश आले. ही स्पर्धा आयोजीत करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपली लोप पावत चाललेली वारकरी परंपरा जपणे.
या स्पर्धेच्या माध्यमातून कित्येकांच्या घरात भक्तिमय वातावरण ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न या संघटनेने केलेला आहे. सदर स्पर्धेसाठी पहिल्या तीन क्रमांकाची बक्षिसे अनुक्रमे विष्णू आनंदाचे, राजू राऊत आणि सुरज पवार यांनी अनुक्रमे यांनी पुरस्कृत केली होती. तसेच उदय नागवडेकर यांनी सर्व विजेत्यांना चषक दिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विनायक केसरकर आणि आशिष कोचेरी यांनी विशेष परिश्रम घेतले.