सरकारी कार्यालयांमध्ये कामकाज सुरू असताना फोटो आणि व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर शेअर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे कर्नाटक सरकारने आता एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. राज्य सरकारच्या या नव्या आदेशानुसार सरकारी कार्यालयातील कामाच्या वेळेमध्ये सार्वजनिकांकडून अनधिकृतरित्या फोटो काढणे किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे यावर बंदी घालण्यात आली आहे.
सदर आदेशाची अंमलबजावणी प्रत्येक सरकारी कार्यालयांमध्ये म्हणजे शहर, गाव, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावरील सर्व सरकारी कार्यालयामध्ये केली जाणार आहे. सरकारी कार्यालयामध्ये येणारे काही नागरिक आपले काम करून घेत असताना कार्यालयातील फोटो किंवा व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करतात.
हा प्रकार करून सरकारी कर्मचारी विशेष करून महिला कर्मचाऱ्यांना त्रास देण्यात येत असल्याचे सत्य राज्य सरकारच्या निदर्शनास आल्यामुळे वरील प्रमाणे फोटो व व्हिडिओ बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारी कार्यालयांमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर त्याचा गैरवापर करण्याद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतिष्ठा डागाळली जात आहे. यामुळे विशेष करून महिला कर्मचाऱ्यांना अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घातल्यानंतर सरकारी कार्यालयांमध्ये सार्वजनिकांकडून फोटो किंवा व्हिडिओ काढण्यावर निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे लक्षात येताच त्यावरील बंदीचा उपरोक्त महत्त्वपूर्ण आदेश सरकारने जारी केला आहे.