बेळगाव शहरातील किल्ला तलावानजीक उभारलेल्या देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभ व राष्ट्रध्वजाच्या देखभालीसाठी महापालिका दरवर्षी नगर विकास योजनेतून 5 लाख रुपये खर्च करणार आहे. या ध्वजस्तंभ देखभालीच्या कंत्राटासाठी काढलेल्या निवेदला प्रतिसाद मिळाला असून दोन निविदा दाखल झाल्या आहेत.
किल्ला तलावा नजीकच्या देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभ उभारणीचे काम गेल्या 2017 मध्ये सुरू करण्यात आले. या कामाचे कंत्राट बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीला मिळाले होते. त्यानंतर 2018 मध्ये त्याचे उद्घाटन करून त्या ध्वजस्तंभावर देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज दिमाखात फडकवण्यात आला.
मात्र ध्वजाचा आकार मोठा असल्यामुळे नंतर समस्या उद्भवली. पाऊस आणि वाऱ्यामुळे राष्ट्रध्वजाचे नुकसान झाल्यामुळे 2018 मध्ये तो सन्मानाने खाली उतरवण्यात आला. त्यानंतर ध्वजसंहितेचा अभ्यास करून ध्वजाचा आकार कमी करून देखील समस्या सुटली नाही.
गेल्या 2022 पर्यंत हा ध्वजस्तंभ व राष्ट्रध्वजाच्या देखभालीची जबाबदारी बजाज कंपनीकडे होती. तो कालावधी पूर्ण झाल्यामुळे आता महापालिका नवा कंत्राटदार नियुक्त करणार आहे.
ध्वजस्तंभ देखभालीसाठी 5 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचे कंत्राट देण्यासाठी काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला असून दोन निविदा दाखल झाले आहेत.