…खूप चिखल आहे…भाताचे रोप असे असते… हे सगळे कसे काम करत आहेत… माझा पाय चिखलात अडकून बसला… पण चिखलात मज्जा येत आहे…. हो खरचं शेती करण्यात वेगळाच आनंद आहे. असे म्हणत ते हसरे चेहरे शेतातून, शाळेत परत आले. हो चकित झालात हे हसरे चेहरे म्हणजे दुसरे कोणी नाही तर हे आहेत शालेय विद्यार्थी…..
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मराठी विद्यानिकेतन या शाळेत हा सेंद्रिय शेती कशी करावी हे अनुभवण्यासाठी कृतीयुक्त उपक्रम आयोजित करण्यात आला होता.बेळगाव तालुक्यातील माळेनहट्टी गावात पर्यावरण प्रेमी शिवाजी कागणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय शेती कशा पद्धतीने करण्यात येते याचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष कृतीतून दाखविण्यात आले. सेंद्रिय शेती कशी केली जाते याबरोबरच भात लागण कशी होते हे या उपक्रमातून सादर करण्यात आले
इयत्ता नववीच्या चाळीस विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सकाळी नऊ ते सायंकाळी पाच असा हा उपक्रम ठरविण्यात आला.त्यानुसार मंगळवारी सकाळी विद्यार्थी शाळेतून माळेनहट्टी या गावात गेले.या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना आजच्या आधुनिक युगामध्ये रासायनिक शेतीचा सर्रासपणे वापर केला जात आहे परिणामी शेतीचा कस कमी होत आहे यामुळे सेंद्रिय शेती कशा पद्धतीने केली जाते आणि ती कशा पद्धतीने करावी याबाबतचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष कृतीतून सादर करण्यात आले.
यानंतर बेळगाव तालुक्यात उत्पादन असणारे भात पीक कसे लावले जाते अर्थात नटी कशी लावली जाते याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी भातासाठी करण्यात आलेल्या चिखलात उतरून प्रत्यक्ष भात लावून या भात लागणीचा अनुभव घेतला. यामुळे कृतीयुक्त शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेती कशी करावी याचा अनुभव घेतला.
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना समाजविज्ञान या विषयाच्या माध्यमातून शेतीचे प्रकार, त्याच पद्धतीने सेंद्रिय शेती कशा पद्धतीने केली जाते याविषयीचे घटक आहेत.यामुळे विद्यार्थ्यांना याचा प्रत्यक्ष अनुभव यावा व हे घटक त्यांनी कृतीतून शिकावे या उद्देशाने हे आगळे वेगळे शेतातून शिक्षण देण्यात आले. या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षक बी. एम.पाटील ,शांताराम पाटील व निलूताई आपटे हे विद्यार्थ्यांसमवेत त्या ठिकाणी उपस्थित होते.
आजच्या धावपळीच्या युगात रासायनिक शेतीमुळे अनेक व्याधी माणसाला होऊ लागल्या आहेत त्याचबरोबर रासायनिक शेतीमुळे जमिनीचा पोट बिघडत चालला आहे जमिनी निकष बनत चालली आहेत त्यामुळे एकंदर पृथ्वीचा आरोग्य चांगलं राहण्यासाठी सेंद्रिय शेती गरजेची आहे. अशावेळी बेळगावातील मराठी विद्यानिकेतन शाळेने हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी असा स्तुत्य उपक्रम केला आहे.शेतीत रासायनिक प्रक्रियेमुळे पाणी दूषित होत आहे हे सगळं प्रॅक्टिकली पटवून देण्यासाठी अश्या उपक्रमाचे आयोजन महत्त्वाचे आहे.