मजगाव येथे नुकत्याच घडलेल्या युवकाच्या खून प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर करू नये. तसेच खुन्यांना कठोर शिक्षा केली जावी, अशी मागणी मयताच्या कुटुंबीयांनी जय भीम युवक मंडळाच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
मजगाव येथील जय भीम युवक मंडळातर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या गुरुवारी 30 जून रोजी उद्यमबाग -मजगाव परिसरात यल्लेश शिवाजी कोलकार या तरुणाचा अज्ञातांनी निर्घृण खून केल्याचे उघडकीस आल्यामुळे आंबेडकर गल्लीसह मजगाव येथे एकच खळबळ उडाली होती.
सदर खून प्रकरणी उद्यमबाग पोलिसांनी काही आरोपींना गजाआड केले आहे. या आरोपींना कोणत्याही परिस्थितीत जामीन मंजूर होणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी. कारण जामीन मंजूर झालेल्या या आरोपींकडून आम्हाला, आमच्या मुलाबाळांना धोका आहे.
संबंधित खुन्यांना कठोर शासन केले जावे, अशा आशयाचा तपशील मृत यल्लेश कोलकर यांच्या कुटुंबीयांनी जय भीम युवक मंडळामार्फत सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.
जय भीम युवक मंडळाच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून उपरोक्त मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी रवी बस्तवाडकर, प्रतीक कोलकार, शोभा कांबळे, ए. एम. काळे, शोभा पालकर, एम. के. कोलकार, जी. पी. कित्तूर आदींसह जय भीम युवक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.