बेळगावचे प्रादेशिक आयुक्त आणि बिम्सचे प्रशासक आमलान आदित्य बिश्वास यांची अन्यत्र केलेली बदली तात्काळ रद्द करावी आणि बीम्स येथील सर्व विकास कामे -प्रकल्प जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्यांना त्यांच्या पदावर कायम ठेवावे, अशी मागणी बेळगाव शहरवासीय आणि विविध संघटनांच्यावतीने राज्यपालांकडे करण्यात आली आहे.
प्रादेशिक आयुक्त आणि बिम्सचे प्रशासक आमलान आदित्य बिश्वास यांची अन्यत्र केलेली बदली केल्याच्या निषेधार्थ शहरातील नागरिक आणि विविध संघटनांच्यावतीने उपरोक्त मागणीचे निवेदन राज्यपालांकडे धाडण्यासाठी आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरेने राज्यपालांकडे पाठवून देण्याचे आश्वासन दिले. सध्या शहरातील बीम्स हॉस्पिटलचा सर्वांगीण विकास प्रामुख्याने या हॉस्पिटलचे प्रशासक प्रांताधिकारी आमलान आदित्य बिश्वास यांच्या कुशल नेतृत्वामुळे होत आहे.
बिश्वास यांनी या हॉस्पिटलची सूत्रे हाती घेतल्यानंतर या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरिबांना उत्तम वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध होऊ लागल्या आहेत. एकेकाळी बेशिस्त आणि अस्वच्छ असलेल्या या हॉस्पिटलचे आज स्वच्छ सुंदर हॉस्पिटलमध्ये परिवर्तन झाले आहे. भ्रष्टाचाराचे कुरण बनलेल्या हॉस्पिटल मधील कामकाजात पारदर्शकता येऊन चांगली शिस्त लागली आहे.
बीम्सचा अधिकाधिक उत्कर्ष व्हावा यासाठी आमलान बिश्वास सरकारकडून निधी उपलब्ध करून घेण्याद्वारे विविध विकास कामे राबवीत होते. त्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत होते. मात्र उत्तमरीत्या कार्य करणाऱ्या बिश्वास यांची आता अचानक बदली करण्यात आली आहे. बिश्वास यांनी हॉस्पिटलमधील गैरकारभार -भ्रष्टाचाराला घातलेला आळा आणि कामकाजाला लावलेली शिस्त अनेकांच्या डोळ्यात खूपत होती.
कांही स्थानिक राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांना बीम्समध्ये पूर्वीसारखे मोकळे रान हवे आहे. यासाठीच जाणून बुजून प्रादेशिक आयुक्त बिश्वास यांची बदली करण्यात आली आहे. मात्र यामुळे बीम्स हॉस्पिटलची प्रगती खुंटून तिथे पुन्हा पूर्वीसारखा अनागोंदी कारभार सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या खेरीज हॉस्पिटलची काही विकास कामे अर्धवट अवस्थेत आहेत तर कांही महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविले जावयाचे आहेत.
या सर्वांवर अमलान बिश्वास यांच्या बदलीमुळे विपरीत परिणाम होणार आहे. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन प्रांत अधिकारी व बीम्सचे प्रशासक आमलान आदित्य बिश्वास यांची बदली तात्काळ रद्द करावी. जोपर्यंत त्यांनी हाती घेतलेली विकास कामे आणि प्रकल्प पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्यांची बदली करू नये, अशा आशयाचा तपशील राज्यपालांना पाठवलेल्या निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद ॲड. एन. आर. लातूर, संतोष कांबळे, अनंतकुमार ब्याकुड, मुख्तार इनामदार, सुभाष कांबळे, संतोष कांबळे, शिवानी चलवेटकर, कलाप्पा पाटील, डी एम. चव्हाण, शकील मुल्ला आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.