खानापूर तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या बैलूर आणि आसपासच्या गावातील विद्यार्थ्यांची अनियमित बस सेवेमुळे मोठी गैरसोय होत आहे. यासाठी या गावाला वेळेवर बससेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच अतिरिक्त बस सेवेची सोय करावी, या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी, ग्रामस्थ व ग्रा. पं. सदस्यांनी आज सोमवारी सकाळी परिवहन खात्याच्या विभागीय नियंत्रकांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
बैलूर हे गाव खानापूर तालुक्यात असले तरी तेथील सर्व विद्यार्थी बेळगाव येथे शिक्षणासाठी येतात. गेल्या अनेक वर्षापासून या गावाला बस सेवेची समस्या भेडसावत आहे. अलीकडच्या काळात या गावाचा विस्तार वाढला आहे. बैलूर ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात बैलूरसह उचवडे, मोरब आदी 7 गावे येतात. एकट्या बैलूर गावातील सुमारे 180 विद्यार्थी -विद्यार्थिनींसह आसपासच्या सर्व गावातील मिळून शेकडो विद्यार्थी बेळगाव येथे शिक्षणासाठी येत असतात.
मात्र बैलूर गावची बससेवा अनियमित असल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याखेरीज बैलूर हे गाव बेळगाव -चोर्ला मार्गावर येत असल्यामुळे बसमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्याचा फटकाही विद्यार्थीवर्गाला बसतो. यात भर म्हणून बऱ्याचदा बसचालक आणि वाहकाकडून बस कोठेही थांबवण्याची मनमानी केली जाते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन बैलूर गावची बससेवा नियमित करण्याबरोबरच या गावासाठी अतिरिक्त बस सेवेची व्यवस्था केल्यास विद्यार्थी -विद्यार्थिनींची चांगली सोय होणार आहे, अशा आशयाचे निवेदन विभागीय नियंत्रकांना सादर करण्यात आले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी आजचे विद्यार्थी हे देशाचे उद्याचे भावी आधारस्तंभ आहेत. त्यामुळे परिवहन मंडळाच्या विभागीय नियंत्रकांनी विद्यार्थी वर्गाच्या मागणीनुसार त्या त्या मार्गावर प्राधान्याने जादा बसेस सुरू केल्या पाहिजेत. परिवहन मंत्र्यांनी देखील याची गांभीर्याने दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आवश्यक गावांसाठी ज्यादा बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी माझी विनंती आहे, असे सांगून परिवहन मंडळाला बैलूर परिसरातील विद्यार्थ्यांच्या मागणीची पूर्तता करणे जमत नसल्यास त्यांनी तसेच स्पष्ट सांगावे. आम्ही त्या गावाला बसची सोय करून देऊ, असेही कोंडुसकर यांनी स्पष्ट केले.
ग्रा. पं. सदस्य विठ्ठल नाकाडे यांनी यावेळी बोलताना बैलूर गावचा वाढलेला विस्तार तसेच प्रवासी व विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता या गावासाठी अतिरिक्त बस सेवा अत्यावश्यक असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे नियमित व अतिरिक्त बससेवेच्या आमच्या मागणीची लवकरात लवकर पूर्तता न झाल्यास सर्व राजकीय पक्ष व संघटनांच्या सहकार्याने बैलूरसह आसपासच्या गावातील समस्त ग्रामस्थ, विद्यार्थी आणि ग्रामपंचायत सदस्यांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल. बेळगाव -गोवा महामार्गावरील बैलूर क्रॉस येथे रास्ता रोको केला जाईल आणि यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, असा इशाराही ग्रा. पं. सदस्य नाकाडी यांनी दिला. याप्रसंगी बैलूर ग्रामस्थांसह बहुसंख्य विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.