Friday, December 20, 2024

/

बेळगाव स्मार्ट व्हायचे असल्यास गटार साक्षरता मोहीम राबवा’..

 belgaum

जोरदार पावसामुळे काल मंगळवारी दुपारी जुन्या धारवाड रोडवर अचानक मोठ्या प्रमाणात पाणी येऊन हा रस्ता पाण्याखाली गेला. जेमतेम अर्ध्या तासाच्या पावसामुळे ड्रेनेज तुंबून हा प्रकार घडला. या पद्धतीने शहरात गटारी आणि ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे बेळगावात ‘गटार साक्षरता अभियान’ राबविणे काळाची गरज बनली आहे.

गटार साक्षरता अभियान यशस्वी करणे ही प्रशासनाबरोबरच नागरिकांची देखील जबाबदारी आहे. आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी हातात हात घालून काम केल्यास काय घडू शकते हे जगप्रसिद्ध लंडन शहराने दाखवून दिले आहे. एकेकाळी लंडन हे शहर अत्यंत अस्वच्छ समजले जात होते. मात्र तेथील नागरिकांनी प्रशासनाच्या मदतीने शहर स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविले आणि आजच्या घडीला लंडन हे जगातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाते. याच लंडनचा आदर्श बेळगावकरांनी घेण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे. गटारी आणि ड्रेनेजचा वापर कशासाठी केला जातो याचे माफक ज्ञान सर्वांनाच असले तरी त्यांचा वापर योग्यरित्या केला जात नसल्यामुळे थोडक्यात नागरिक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या चुकीसह गटारी -ड्रेनेज यांचे अवैज्ञानिक बांधकाम सध्या आपल्या शहरातील गटारी -ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन अस्वच्छता निर्माण होण्यास कारणीभूत ठरत आहे.

बहुतांश नागरिक केरकचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे टाकाऊ साहित्य गटारीत फेकून देतात. स्वच्छता कर्मचारी देखील आपले काम हलके करण्यासाठी रस्तावर जमा कचऱ्याची विल्हेवाट लावण्याऐवजी तो अलगद गटारीमध्ये ढकलून देण्यात धन्यता मानतात. या प्रकारांमुळेच गटारी आणि ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. त्याचप्रमाणे अवैज्ञानिकरित्या बांधण्यात आलेली गटारे -ड्रेनेज हे देखील पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीला कारणीभूत ठरत आहेत.

या सर्व गोष्टी लक्षात घेता बेळगाव महानगरपालिकेकडून ‘गटार साक्षरता अभियान’ राबवणे ही काळाची गरज बनली असून नागरिकांनी देखील यासाठी सहकार्य करणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. काय आहे गटार साक्षरता अभियान? गटार साक्षरता मोहीम म्हणजे गटारातून पाण्याचा व्यवस्थित निचरा झाला पाहिजे हे लोकांना समजावून सांगणे. आपल्या आजूबाजूची गटारे कशी स्वच्छ ठेवली पाहिजेत याची नागरिकांना माहिती देणे. मनपा सफाई कर्मचाऱ्यांना देखील याची माहिती देणे. यासाठी स्थानिक नागरिकांसह खास करून सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणे. गटार अथवा ड्रेनेज हे ‘कचराकुंड’ नसून सांडपाण्याच्या निचऱ्यासाठीचा एक मार्ग आहे हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे. आपल्या आसपासची गटारे ड्रेनेज स्वच्छ राहिले तरच आपले आरोग्य तंदुरुस्त राहू शकते.

Sevral shops water
गटारीचे पाणी दुकानात शिरल्याने झालेली अवस्था…old pb road hangirkar complex

बेळगावात गटार साक्षरता अभियान अर्थात मोहीम राबविण्यासाठी पहिल्यांदा महापालिकेने त्यांचे जे प्रभागवार सफाई कर्मचारी आहेत त्यांना रस्त्यावरील कचरा गटारीत टाकू नये अशी सक्त सूचना द्यावी. त्याचप्रमाणे नागरिकांना गटारीमध्ये कचरा टाकण्यापासून परावृत्त केले जावे. गटारात कचरा भरलेल्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्या वगैरे अडगळीचे साहित्य टाकले जाऊ नये. कोरोना प्रादुर्भावामुळे अलीकडच्या काळात स्वयंस्फूर्तीने समाजकार्य करण्यासाठी अनेक युवक पुढे सरसावले आहेत. या कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात गटार साक्षरता मोहीम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. याखेरीज ही मोहीम यशस्वी करण्यासाठी महापालिकेकडून बक्षीस योजना सुरू केली जावी. यामुळे आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनाच प्रोत्साहन मिळेल. पावसाळ्यामध्ये बेळगावात गटारी आणि ड्रेनेज तुंबून रस्त्यावर पाणी वाहण्यास पूर परिस्थिती निर्माण होण्यास प्रामुख्याने गटारात टाकला जाणारा केरकचरा कारणीभूत आहे. या कचऱ्यामुळे सांडपाण्याचा निचरा न होता ते जागी तुंबते. याव्यतिरिक्त अवैज्ञानिक बांधकाम हे देखील याला कारणीभूत आहे.

Drainage rain water
Old pb road drainage rain water on road

नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे ज्या ठिकाणी काटकोनात गटारी अथवा ड्रेनेज जोडले गेले आहेत त्या ठिकाणी सांडपाणी ओव्हर फ्लो होण्याची समस्या शहरात भेडसावत आहे. निसर्ग आपसूक आपल्याला जे कांही देत असतो त्याची जपणूक करणे ही मनुष्याची जबाबदारी आहे. पाणी हे देखील निसर्गाचे वरदान आहे, मग ते सांडपाणी असो अथवा स्वच्छ पाणी त्याचे नियोजन व्यवस्थित करणे ही मनुष्याची जबाबदारी आहे. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. खरे तर सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो.

बेळगाव शहराच्या सांडपाण्याच्या बाबतीत हा प्रकल्प देखील राबवता येऊ शकतो. मात्र त्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची इच्छाशक्ती आणि नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. मनुष्याने निसर्गाचे लूट चालवली असल्यामुळे भविष्यात पाण्याची समस्या गंभीर होणार आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन ही काळाची गरज बनली आहे. त्याचप्रमाणे बेळगाव स्मार्ट सिटी व्हावयाची असल्यास सर्वप्रथम गटार साक्षरता अभियान यशस्वी होणे अत्यावश्यक आहे, हे देखील तितकेच खरे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.