सरकार प्रशासन आपल्या तक्रारीची दखल घेईल म्हणून तब्बल सुमारे एक दशक वाट पाहुनही कोणतीच हालचाल होत नसल्याने मदत मिळण्याची आशा सोडून देऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतःच पुढाकार घेत अत्यंत दयनीय अवस्थेतील उर्दू माध्यम सरकारी शाळा क्र. 5 या शाळेची स्वखर्चाने दुरुस्ती आणि विकास साधण्याची जबाबदारी घेतली आहे. याची स्थानिक नागरिकांसह शिक्षण प्रेमींमध्ये प्रशंसा होत आहे
शहरातील घी गल्ली येथील उर्दू माध्यम सरकारी शाळा ही 1941 साली स्थापना झालेली स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळा आहे. पूर्वीच्या जुन्या काळात ही शाळा बेळगावातील एक प्रसिद्ध शाळा म्हणून ओळखली जात होती. परंतु पुढे शिक्षण खात्याचे या शाळेच्या देखभालीकडे दुर्लक्ष होऊ लागल्यामुळे कालांतराने शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. या संदर्भात बोलताना सदर शाळेबद्दल अतिशय चिंता असणारे सामाजिक कार्यकर्ते मुबीन मुजावर म्हणाले की, 1980 ते 1990 या कालावधीत घी गल्ली येथील उर्दू सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या सुमारे 700 इतकी होती. मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणास येत असल्यामुळे शाळेनजीकच्या सरकारी जागेत त्यांना शिकवण्याची व्यवस्था करावी लागत होती. मात्र सध्याच्या परिस्थितीत या शाळेमध्ये अवघे 17 विद्यार्थी आहेत.
देखभाली अभावी शाळेची अवस्था दयनीय होऊ लागल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येला गळती लागली. बरेच विद्यार्थी शाळा सोडून जाऊ लागले. घी गल्ली आणि परिसरातील बहुतांश लोकसंख्या ही गरिबीच्या रेषेखालील आहे. ही परिस्थिती असतानाही शाळेच्या दयनीय अवस्थेमुळे येथील गरीब लोक देखील आपल्या मुलांना या शाळेत पाठवेनासे झाले आहेत, असा आरोप मुजावर यांनी केला
गेल्या दहा वर्षापासून कांही सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांनी सदर शाळेच्या दुरावस्थेकडे लक्ष देऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले जावे, अशी मागणी वारंवार शिक्षण खात्याकडे केली आहे. तथापि आजतागायत या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. शिक्षण खात्याकडून दखल घेतली जात नसल्यामुळे माझ्यासह सामाजिक कार्यकर्ते शकील बागलकोटी, माजी आमदार रमेश कुडची आणि अन्य कांही जणांनी एक बैठक घेतली. या बैठकीत आम्ही सर्वांनी स्वतःच्या खिशातील पैसे घालून शाळेचा विकास करण्याचा निर्णय घेतला. यावेळी माजी आमदार कुडची यांनी शाळेसाठी नवे बेंचेस देण्याचे आश्वासन दिले. ज्याची किंमत किमान 1 लाख होऊ शकते. बागलकोटी यांनी देखील शाळेच्या काही दुरुस्त्यांची जबाबदारी स्वतःकडे घेतली.
शाळेच्या छताच्या दुरुस्तीसाठी मोठ्या निधीची गरज आहे. त्यामुळे ते काम वगळता नव्या पाण्याच्या पंपासह उर्वरित सर्व किरकोळ दुरुस्तीची कामे आम्ही केली आहेत. शाळेचे रंगकाम आणि पावसाळ्यात गळती लागू नये यासाठी वॉटरप्रूफिंगचे काम सध्या सुरू आहे. आता सदर शाळेमध्ये उर्दू माध्यमाबरोबरच इंग्रजी माध्यमाचा ही समावेश केला जावा अशी मागणी आम्ही शिक्षण खात्याकडे केली आहे. मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. जर या शाळेत इंग्रजी माध्यमाला परवानगी देण्यात आली तर शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या पुन्हा झपाट्याने वाढेल असा विश्वासही सामाजिक कार्यकर्ते मुबीन मुजावर यांनी व्यक्त केला.