स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हाती घेतलेल्या रस्त्यांच्या कामाच्या विरोधातील तक्रारींची दखल घेतली जात नसल्याची एसीबीकडे तक्रार करणाऱ्या राजकुमार एम. टोपण्णावर आणि इतरांना बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकांनी शहरातील सर्व स्मार्ट काँक्रीट रस्ते मानकांनुसार उत्तम स्थितीत असल्याचे उत्तर दिले आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या (बीएससीएल) व्यवस्थापकांनी दिलेल्या उत्तराचा विस्तृत आशय पुढील प्रमाणे आहे. कामाचा दर्जा : रस्त्याच्या कामाचा दर्जा त्रयस्तांच्या (थर्ड पार्टी) निरीक्षणाखाली स्मार्ट सिटी रस्त्यांच्या मानकानुसार राखण्यात आला आहे. रस्त्यांचे व्हाईट टॉपिंग करण्यात आले आहे. कर्मचारी भरती : बीएससीएल -एसपीव्ही मधील कर्मचारी भरती प्रक्रिया सर्वोत्तम उमेदवाराची निवड हा उद्देश समोर ठेवून राबविण्यात आली आहे.
त्यानुसार तज्ञ समितीकडून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या तज्ञ समितीमध्ये बेळगावातील नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचा समावेश होता. कंत्राटी पद्धतीने काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून करारावर स्वाक्षरी घेण्यापूर्वी नेमणूक व मानधन कमिटी आणि संचालक मंडळाची मंजुरी घेण्यात आली आहे.
अपूर्वा कन्स्ट्रक्शन्स : अपूर्वा कन्स्ट्रक्शन्स या कंपनीला मध्यवर्तीय बस स्थानकाच्या (सीबीटी) नूतनीकरणाच्या कामाचे कंत्राट कलामंदिर प्रकल्पाची निविदा काढण्यापूर्वी 9 ऑक्टोबर 2018 रोजी देण्यात आले आहे. कर्नाटक सार्वजनिक खरेदी पारदर्शकता कायदा 1999 नुसार सीबीटीचे कंत्राट देण्यात आले असून तांत्रिक छाननी समितीची कामाला मंजुरीही मिळाली आहे. रेखा विभागाच्या जमीन हस्तांतर प्रक्रियेमुळे या प्रकल्पाच्या कामाला विलंब झाला आहे.
कलामंदिर प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत अपूर्वा कन्स्ट्रक्शन्सने बनावट कागदपत्रे दाखल केल्याचा जो आरोप आहे त्या संदर्भात संबंधित कागदपत्रांची तपासणी -पडताळणी करून सरकारी नियम आणि केटीपीपी कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल.