खादरवाडी येथील मराठा मंडळ इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेने नुकत्याच झालेल्या झोनल पातळीवरील प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सव 2022 -23 मध्ये घवघवीत यश संपादन करताना तब्बल 15 सुवर्ण आणि 3 रौप्य पदक हस्तगत केली आहेत.
किणये येथील सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे सलग दोन दिवस आयोजित झोनल पातळीवरील प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सव आज शनिवारी उत्साहात पार पडला. या महोत्सवातील कुस्ती, ज्युडो आणि कराटे या क्रीडा प्रकारांमध्ये खादरवाडी येथील मराठा मंडळ इंग्लिश मीडियम स्कूलच्या क्रीडापटूंनी तब्बल 15 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांची कमाई केली. झोनल पातळीवरील या उल्लेखनीय कामगिरीमुळे संबंधित क्रीडापटूंची आता तालुका पातळीवरील क्रीडा महोत्सवासाठी निवड झाली आहे.
झोनल पातळीवरील कुस्ती, ज्युडो व कराटे स्पर्धांमध्ये खादरवाडी मराठा मंडळ इंग्लिश शाळेच्या साहिल नंदगडकर, अझान शरीफ मोहम्मद धामणेकर, जाहिद सय्यद, आदित्य सलाम, प्रथमेश बस्तवाडकर, स्वराज्य पाटील, आचल पाटील, भुवनेश्वरी, राधिका नेसरकर, श्रेया पाटील, भार्गवी सुतार, सुषमा शिंदे आणि अंकिता कंकणमेले या क्रीडापटूंनी चमकदार कामगिरी नोंदविली.
या सर्व क्रीडापटूंना शाळेचे क्रीडा शिक्षक आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अतुल शिरोळे यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापिका वनश्री नायर आणि मराठा मंडळ संस्थेचे अध्यक्ष राजश्री नागराजू यांचे प्रोत्साहन लाभत आहे उपरोक्त यशाबद्दल संबंधित क्रीडापटूंचे शाळेसह सर्वत्र अभिनंदन होत आहे.
बेळगावचे आंतरराष्ट्रीय कुस्ती पटू अतुल शिरोळे आता बेळगाव भागांतील उदयोन्मुख खेळाडूंना धडे देत असून कोचच्या भूमिकेत आपले योगदान देत आहेत त्यांनी पहिल्याच प्रयत्नात या शाळेला इतके यश मिळवून दिले आहे.