टीव्हीसह विविध कार्यक्रमांमुळे लोकप्रिय झालेले सुप्रसिद्ध वास्तु विशारद सरळ वास्तू ख्यातीचे चंद्रशेखर (वय 55) यांची काल मंगळवारी हुबळी येथील एका हॉटेलमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली. चंद्रशेखर गुरुजींची हत्या कशामुळे झाली त्यामागचे नेमके कारण काय? याचा उलगडा आता पोलीस तपासामध्ये होऊ लागला आहे.
वास्तु विशारद चंद्रशेखर यांची हत्या संपत्तीच्या वादातूनच झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्या सरळ वास्तू या संस्थेमध्ये काम करणारे महांतेश शिरूर आणि चंद्रशेखर गुरुजी यांच्यातील आर्थिक व्यवहारात वाद निर्माण झाले होते. या वादातूनच चंद्रशेखर यांची हत्या करण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चंद्रशेखर यांच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेले महांतेश शिरूर आणि मंजुनाथ दामरोळ हे दोघेही सरळ वास्तू या संस्थेत काम करत होते. या संस्थेमधील वनसाक्षी नावाच्या तरुणीशी कांही वर्षांपूर्वी महांतेश याचे लग्न झाले होते. चंद्रशेखर गुरुजी आपल्या संस्थेत जे कांही काम अथवा आर्थिक व्यवहार करायचे त्याची खडाणखडा माहिती या तिघांना होती.
वनसाक्षी ही महिला कर्मचारी चंद्रशेखर गुरुजी यांची एकदम निकटवर्ती म्हणून ओळखले जायची. या अगोदर महांतेश आणि मंजुनाथ हे दोघे देखील त्यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते.
गेल्या कांही दिवसापासून महांतेश, मंजुनाथ आणि गुरुजी यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाला होता. हे सर्व पैलू लक्षात घेऊन हुबळी येथील अनेकल पोलिसांनी तपास चालू ठेवलेला आहे एकूणच चंद्रशेखर यांचा खून आर्थिक व्यवहार आणि संपत्तीच्या वादातून झाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आलेला आहे.
दोन्ही आरोपींनी सरळ वास्तू संस्थेमध्ये आर्थिक व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे निदर्शनास आल्यामुळे चंद्रशेखर गुरुजी यांनी त्या दोघांनाही कामावरून काढून टाकल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.