आठवडा भर थांबलेला पाऊस शुक्रवारी आल्याने नेहमीप्रमाणे गटारी तुंबल्या आणि शहरातील विविध रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साचले होते.फोर्ट रोड रस्त्यावर, पांगुळ गल्ली आणि फ्रुट मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते.
बेळगाव शहरात आज पुन्हा पावसाच्या पाण्याने कहर केला. गेल्या जवळपास आठवड्याभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज शुक्रवारी दुपारनंतर शहर परिसरात जोरदार हजेरी लावली. परिणामी जनजीवन विस्कळीत होण्याबरोबरच ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी येऊन नागरिकांची तारांबळ उडाली.
आठवड्याभरापूर्वी मुसळधार पावसाने शहरवासीयांना त्रस्त केले होते. त्यानंतर गेले सात-आठ दिवस पावसाचा कहर कमी होऊन उघडीप पडली होती. मात्र आज दुपारनंतर ढगाळ वातावर निर्माण होऊन पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. परिणामी शहरातील ठिकठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले. गटारी व ड्रेनेज तुंबून रस्त्यावर पाणीच पाणी झाल्यामुळे पादचारी व वाहन चालकांची तारांबळ उडाली.
आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी बेळगाव शहरात हजेरी लावल्याने गटारी तुंबल्याने अनेक भागांत पाणी साचले होते फोर्ट रोड परिसरात तुंबलेले पाणी@DcBelagavi pic.twitter.com/ZaTyoZxNN4
— Belgaumlive (@belgaumlive) July 29, 2022
शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, रविवार पेठ, सीबीटी रस्ता, जुना पुना -बेंगलोर रोड अर्थात फोर्ट रोड, ओव्हर ब्रिज सर्व्हिस रस्ता आदी रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे वाहन चालकांना विशेष करून दुचाकी वाहन चालकांना मोठा मनस्ताप झाला रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे दुचाकी वाहनस्वारांवर आपली वाहने ढकलत नेण्याची वेळ आली. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे शहरातील जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले आहे. पाऊस आणि रस्त्यावरील पाण्यामुळे शहराच्या बाजारपेठेतील व्यवहार कांही ठिकाणी ठप्प झाले तर कांही ठिकाणी मंदावले.
जोरदार पावसामुळे फोर्ट रोड येथील जिजामाता चौकाचा परिसर तर पूर्णपणे पाण्यात बुडाला होता. या ठिकाणी रस्त्यावर जवळपास गुडघाभर पाणी साचल्यामुळे रहदारीच ठप्प झाली. रस्त्याकडेला पार्क केलेली दुचाकी व चार चाकी वाहने पाण्यात अडकून पडल्यामुळे वाहन चालकांवर रस्त्यावरील पाण्याचा पूर ओसरण्याची वाट पाहत ताटकळावे लागले. बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्याशेजारी दुकानांमध्ये शिरण्याच्या घटना घडल्या.
शहरातील पांगुळ गल्ली येथे गटारी तुंबून रस्त्यावर पाणी आले होते त्यामुळे रस्त्यावर साचलेल्या या सांडपाण्यातून नागरिकांना ये -जा करावी लागली. तसेच येथील काही दुकानांमध्ये पावसाच्या पाण्यासह सांडपाणीही शिरल्यामुळे व्यावसायिकांना नुकसान सोसावे लागले. एकंदर पावसाने अचानक कहर केल्यामुळे शहरातील रस्ते आणि सखल भाग पाण्याखाली जाऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे पहावयास मिळत होते.
आठवडाभर उसंथ घेतलेल्या पावसाने शुक्रवारी हजेरी लावल्याने फ्रुट मार्केट मध्ये शिरलेले पाणी pic.twitter.com/Ksr9lCvOp8
— Belgaumlive (@belgaumlive) July 29, 2022