विस्टा डोम कोचने सुसज्ज हुबळी ते वास्को-द-गामा रेल्वे येत्या 16 जुलैपासून सुरू होणार असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले वृत्त निखालस खोटे असल्याचा खुलासा नैऋत्य रेल्वेने (एसडब्ल्यूआर) केला असून अशा वृत्तांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.
विस्टा डोम कोच असलेल्या नव्या रेल्वे गाडीचे जे प्रसिद्धी पत्र सोशल मीडियावर फिरत आहे ते खोटे असून कोणीतरी हे अनधिकृत वृत्त प्रसिद्ध करून लोकांची दिशाभूल करत आहे, असे नैऋत्य रेल्वेने म्हंटले आहे. नैऋत्य रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकाची नक्कल करून कोणीतरी विस्टा डोम कोच असलेल्या हुबळी ते वास्को-द-गामा रेल्वेचे वृत्त सोशल मीडियावर शेअर केले आहे आणि त्यावर विश्वास ठेवून अनेकांनी ते आपल्या मित्रमंडळी स्वकीयांना शेअर केले.
परिणामी हुबळी -धारवाड आणि बेळगाव शहरांमध्ये हे वृत्त चर्चेचा विषय बनले होते. हुबळी -धारवाड येथील नागरिकांनी या वृत्ताचे स्वागत केले, तर बेळगावच्या रहिवाशांनी ती रेल्वे आपल्या शहरातून सुरू होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हे देखील या खोट्या वृत्ताला बळी पडले आणि त्यांनी आपल्या पर्सनल अकाउंटवरून ट्विट करताना हुबळी ते वास्को-द-गामा रेल्वेच्या विस्टा डोम कोचमुळे प्रवासी, पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटू शकतील असे म्हंटले होते. मात्र नंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले. विस्टा टोक कोच असलेल्या रेल्वेच्या वृत्तामुळे नैऋत्य रेल्वेचे गोवा येथील मुख्यालय देखील आश्चर्यचकित झाले. निवृत्ती रेल्वेचे बहुतांश अधिकारी या प्रगतीबद्दल अनभिज्ञ असल्यामुळे त्यांनी आपल्या वरिष्ठांना फोन लावून हे वृत्त खोटे असल्याची खातर जमा करून घेतली.
अखेर काल शुक्रवारी नैऋत्य रेल्वेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून विस्टा डोम कोच असलेल्या हुबळी ते वास्को-द-गामा रेल्वे गाडीचे वृत्त खोटे असल्याचा खुलासा केला आहे. तसेच अशा खोट्या व चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये.
रेल्वे विभाग याबाबत चौकशी करून सत्य बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील राहील. नैऋत्य रेल्वे आपल्या वेबसाईटवर व ट्विटरवर नवीन रेल्वे सेवा आणि सुविधा बाबत वेळोवेळी माहिती देत राहते, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असेही खुलाशात स्पष्ट करण्यात आले आहे.
विस्टा डोम कोच केवळ प्रस्ताव होता मात्र काहींनी ही योजना लागू झाली असे संदेश फिरवले आहेत असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.