पोलीस पडताळणीसाठी (पोलीस व्हेरिफिकेशन) अर्ज करणे अथवा ते प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असून आता त्यासाठी नागरिकांना पोलीस आयुक्त /जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाला जाण्याची गरज नाही असे राज्याच्या डीजीपींनी ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे.
डीजीपींच्या सूचनेनुसार बेळगावात जर कोणाला पोलीस पडताळणी प्रमाणपत्राची गरज असल्यास त्यांना ते मिळवण्यासाठी सेवा सिंधू वेबसाईटला भेट द्यावी लागेल. पोलीस पडताळणी (पोलीस व्हेरिफिकेशन) प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यास नागरिकांना पोलीस आयुक्त अथवा जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयाकडे अर्ज करावे लागणार नाहीत.
त्याचप्रमाणे ते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उपरोक्त अधिकाऱ्यांच्या कार्यालयातही जावे लागणार नाही. आता 100 टक्के अर्ज ऑनलाईन स्वीकारले जात असून डिजिटली स्वाक्षरी केलेले पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन पाठवले जात आहे. यासाठी सेवा सिंधू ॲपवर https://kept.karnataka.gov.in ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे
नागरिकांनी सेवा सिंधू वर क्लिक करावे. श्रेणी निवडावी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करून आवश्यक शुल्क ऑनलाईन भरावे. प्रत्यक्ष भौतिक पडताळणीसाठी तुम्हाला एकदा पोलीस ठाण्यात बोलाविले जाईल. त्यानंतर तुमचे पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र इमेल /डाउनलोडिंगद्वारे पाठवले जाईल. सदर सुविधेमुळे आता नागरिकांचे पोलीस मुख्यालयाचे उंबरठे झिजवणे बंद होणार आहे.