मागील आठवड्यापासून संततधार पावसाला प्रारंभ झाल्यामुळे धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सोयीसाठी वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने हिडकल डॅम -गोडचिनमलकी -गोकाक फॉल्स अशी विशेष बस सेवा सुरू केली आहे.
सदर विशेष बस दुसरा व चौथा शनिवार, दर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी धावणार आहे. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून हि बस सकाळी 9 वाजता सुटून सकाळी 11 वाजता हिडकल डॅम, दुपारी 1 वाजता गोडचिनमलकी आणि दुपारी 4 वाजता गोकाक फॉल्स त्यानंतर सायंकाळी 6 वाजता पुन्हा बेळगावला पोहोचणार आहे.
मागील आठवड्यापासून पावसाचा जोर वाढल्याने गोकाक व गोडचिनमलकी येथील धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहेत. दरम्यान पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी ही विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे.
सदर बस सेवेसाठी माफक 200 रुपये तिकीट आकारणी केली केली जात असून एका दिवसात तीन पर्यटन स्थळे पाहता येणार आहेत.
आगाऊ बुकिंग सुरू असून इच्छुकांनी ऑनलाईनसाठी http://ksrtc.in या वेबसाईटला भेट द्यावी किंवा अधिक माहितीसाठी 7760991612, 7760991613 अथवा 7760991625 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.