अनैतिक संबंधातून प्रियकराने आपल्या प्रेयसीचा खून केल्यानंतर स्वतः देखील आत्महत्या करून जीवन संपविल्याची खळबळजनक घटना शहरातील बसव कॉलनी येथे आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
प्रेयसीचा खून करणाऱ्या मयत प्रियकराचे नांव रामचंद्र बसाप्पा तेणगी (मुळ रा. सौंदत्ती) असे आहे. खून झालेली त्याची प्रेयसी रेणुका बेळगावमध्ये नर्सिंगचा कोर्स करत होती. रेणुकाचा खून केल्यानंतर रामचंद्र याने स्वतः देखील गळफास घेऊन आपले जीवन संपविले.
याबाबतची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस ठाण्याचे सीपीआय मंजुनाथ हिरेमठ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलला धाडले.
या संदर्भात प्रसार माध्यमांना माहिती देताना पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी सदर घटना एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याचे सांगून अनैतिक संबंधातून युवतीचा खून झाल्याचे स्पष्ट केले.
आत्महत्या करण्यापूर्वी रामचंद्र याने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.