ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनावरांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत. यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील असून त्या अनुषंगाने बेळगावसह सात जिल्ह्यांमध्ये तब्बल 82 फिरती पशुचिकित्सालय सुरू करण्यात येणार आहेत. या फिरत्या पशुचिकित्सालयांचा लोकार्पण सोहळा उद्या मंगळवार दि. 19 जुलै रोजी सुवर्णसौध आवारात होणार आहे.
सुवर्णसौध येथे होणाऱ्या या सोहळ्यास राज्याचे पशुसंगोपन मंत्री प्रभू चव्हाण, जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ आणि स्थानिक आमदारांची उपस्थिती असणार आहे. राज्यात एकूण 275 फिरती पशुचिकित्सालय सुरू करण्यात आली आहेत.
त्यापैकी 17 फिरती वाहने बेळगाव जिल्ह्यात धावणार आहेत. उत्तर कर्नाटकातील सात जिल्ह्यातील 82 फिरत्या पशु चिकित्सालयांपैकी बेळगावात 17, बागलकोट 13, धारवाड 8, कारवार 11, विजयपूरा 14, हावेरी 9, गदग 7 या पद्धतीने ही पशुचिकित्सालयं रस्त्यावर धावणार आहेत.
त्यामुळे दुर्गम भागातील पशुपालकांच्या जनावरांनाही आता घरोघरी उपचार मिळणार आहेत. याखेरीस जनावरांच्या आरोग्यासंबंधी तक्रारी तातडीने मार्गी लागणार आहेत या फिरत्या पशुचिकित्सालय वाहनांच्या माध्यमातून गावोगावी फिरवून जनावरांना आरोग्याच्या सुविधा दिल्या जाणार आहेत. कृत्रिम गर्भधारणा, लसीकरण, औषधोपचार आणि इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत
बेळगाव जिल्ह्यात 28 लाख जनावरे आहेत. त्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे जनावरांना आरोग्याच्या सुविधा मिळणे अशक्य बनले आहे. अशा परिस्थितीत ही फिरती पशु चिकित्सालय पशुपालकांना आधार ठरणार आहेत. दर 1 लाख जनावरांमागे एक फिरते पशुचिकित्तालय वाहन उपलब्ध होणार आहे.
या पशुचिकित्सालय सुविधेचा लाभ घेण्यासाठी 1962 या टोल फ्री क्रमांकावर पशुपालकांनी कॉल करावा. या हेल्पलाइनवर फोन केल्यानंतर जनावरांवर उपचार करण्यासाठी शेतकरी, पशुपालकांच्या दारापर्यंत पशुचिकित्सालय वाहन येणार आहे.
या फिरत्या दवाखान्यामुळे जनावरांना उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत, असे पशु संगोपन खात्याचे उपसंचालक राजीव कुलेर यांनी स्पष्ट केले आहे.