माकड -वानरांना साक्षात बजरंग बली श्री मारुतीरायाचे दुसरे रूप मानले जाते. त्यामुळे आज शनिवार मारुतीचा वार आणि मारुती नावाच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराप्रसंगी एका वानराची चितेच्या ठिकाणी उपस्थिती हा प्रसंग सध्या शहापूर परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.
याबाबतची माहिती अशी की, जोशी गल्ली शहापूर येथील मारुती (भाऊ) सखाराम कडगावकर (वय 65) यांचे काल रात्री निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, एक चिरंजीव, एक विवाहित कन्या, दोन भाऊ, दोन बहिणी, नातवंडे व पुतण्या असा परिवार आहे. मारुती कडगावकर यांच्यावर आज शनिवारी सकाळी शहापूर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
विशेष बाब ही की, मयत मारुती यांचे शव अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीमध्ये आणताच त्या ठिकाणी अचानक एक वानर अवतीर्ण झाले. प्रारंभी अंत्यसंस्कारास आलेल्या मंडळींनी त्या वानराकडे दुर्लक्ष केले. मात्र स्मशानात दाखल झालेले ते वानर प्रथम मारुती कडगावकर यांच्यासाठी आणलेल्या लाकडांवर बसून राहिले. इतकेच नाही तर त्याने मारुती यांच्या शवाला स्पर्श करण्याची कृती केली.
प्रत्यक्षदर्शींच्या मते त्या वानराला मयत मारुती यांना पाणी देखील पाजायचे होते परंतु स्मशानातील गोंधळामुळे त्यांनी तसे केले नाही. त्यानंतर ते वानर मारुती कडगावकर यांची चिता रचली जाईपर्यंत दाहिनीवर एका कडेला बसून होते. चितेची लाकडे रचण्याच्या आणि त्यावर मृतदेह ठेवण्याच्या कृतीकडे त्या वानराचे बारीक लक्ष असल्याचे पाहून उपस्थित अंत्यसंस्कारासाठी आलेली मंडळी आवाक् झाली.
आज शनिवार मारुतीचा वार आणि निधन पावलेल्या मारुती कडगावकर यांच्या अंत्यसंस्काराला श्री मारुतीरायांचे प्रती रूप वानराची उपस्थिती हा एक दैवीयोगच असला पाहिजे, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होत होती.
अंतिम संस्कारा वेळी चक्क वानर राजाची उपस्थिती-शहापूर स्मशानभूमीतील प्रकार pic.twitter.com/IQ5aqRIOl1
— Belgaumlive (@belgaumlive) July 30, 2022