महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे त्यामुळे अथणी कागवाड तालुक्यातील कृष्णा नदीला महापूर येण्याची शक्यता आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी पूर्व खबरदारी घ्यावी अशी सूचना माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी केली. दोन वर्षाचा अनुभव पाहता महापूर काळात प्रत्येकाने झोकून देऊन काम करा असेही त्यांनी सांगितले.
कागवाड येथील प्रवाशी मंदिरात तालुका प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकत्रित बोलावून त्यांनी बैठक घेतली.
कागवाड मतदारसंघातील कृष्णा नदीला पूर येऊ नये म्हणून कोणत्या खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याची माहिती त्यांनी घेतली.
कागवाड तालुक्यासाठी एल. वाय. रोडगी यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, आमदारांनी त्यांना वेळोवेळी फोन करून कृष्णा नदीच्या पूरस्थितीची दैनंदिन माहिती देण्याच्या सूचना केल्या. तसेच नदीकाठच्या प्रत्येक गावात यापूर्वीच नोडल अधिकारी नेमण्यात आले असून प्रत्येक गावाला भेट देऊन तेथील पूरस्थितीची पाहणी करून वेळोवेळी माहिती सादर करण्याच्या सक्त सूचना आमदारांनी दिल्या आहेत.
सर्व ती खबरदारी
नदीकाठच्या गावांना रेशनचे धान्य यापूर्वीच देण्यात आले आहे, तसेच नदीकाठच्या गावातील लोकांना व जनावरांना अतिवृष्टी झाल्यास कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी निवारा केंद्रे सुरू करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नदीकाठच्या गरज असलेल्या गावांसाठी बोटीची व्यवस्था केली आहे, जनतेने घाबरण्याची गरज नाही, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत, असा धीर आ. पाटील यांनी नदी काठावरील जनतेला दिला आहे.
यावेळी कागवड तहसीलदार राजेश बुर्ली, जिल्हा पंचायत अधिकारी वीरण्णा वाली, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी वीरनगौडा इगनगौडर, क्षेत्र शिक्षणाधिकारी एम. आर. मुंजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आर. पी. अवताडे, पाटबंधारे विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता शप्रवीण हुनशीकट्टी, सीडीपीओ डॉ.संजीवकुमार सदलगे, कागवड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पुष्पलता सुनदकल्ल यांच्यासह इतर तालुका प्रशासन अधिकारी, नोडल अधिकारी, पोलीस उपस्थित होते.